सरकार खाली खेचण्याची हीच वेळ! शक्तिपीठ रद्दसाठी कामेरीत मेळावा; आमदार सतेज पाटील यांनी सुनावले
फडणवीस सरकार सत्तेच्या जिवावर मस्ती करीत आहे; पण तुम्हाला सत्तेवर बसवलेला शेतकरी तुम्हाला आडवा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्हाला संघर्ष नवा नाही. जोपर्यंत शक्तिपीठ रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पेसे नाहीत, मग महामार्गाला एक लाख कोटी कोठून आणणार, असा सवालही त्यांनी केला.
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी कामेरी (ता. वाळवा) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, डॉ. भारत पाटणकर, सभापती उदयसिंह पाटील, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, विजय पाटील, सी. बी. पाटील, पी. आर पाटील, सरपंच रणजित पाटील, अनिल पाटील, सुनील पाटील, शहाजी पाटील, दि. बा. पाटील आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी शेतकऱयांना शक्तिपीठ रद्द करण्याचा दिलेला शब्द पाळावा. 86 हजार कोटींचा प्रकल्प एक लाखाच्या पुढे कसा गेला? ठेकेदार पोसण्यासाठीचा हा उद्योग आहे. सरकारला जास्त पैसे झाले असतील, तर त्यांनी छत्रपतींच्या किल्ल्यांची दुरुस्ती करावी, शेतकऱयांना, बेरोजगारांना, लाडक्या बहिणींना पैसे द्यावेत.
राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील म्हणाले, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, गरज नसणारा विकास कशासाठी हवा? शेतकऱयांना विश्वासात घेऊन हा मार्ग जाहीर केला का? माझी सरकारला विनंती आहे, शेतकऱयांची मागणी नसताना हा मार्ग करण्यापेक्षा गावांना जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते यावर निधी खर्च करावा. बाधित शेतींना भरपूर मदत मिळणार आहे, या अफवांना बळी न पड़ता शेतकऱयांनी महामार्ग रद्द होईपर्यंत आपला लढा चालू ठेवावा. सत्तेतील पक्षांनी, लोकप्रतिनिधींनी महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला विनंती करायला हवी.
फडणवीस, तुमचा हेतू स्वच्छ नाही – राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, फडणवीस साहेब, तुमचा हा ड्रीम्स प्रोजेक्ट गुंडाळून ठेवा. आम्ही तो कदापी होऊ देणार नाही. तुमचा हेतू विकासाचा नाही. तुमची महत्त्वाकांक्षा राक्षसी आहे. आमचं वाटोळं करून तुम्ही दिल्लीला जायची स्वप्नं बघत असाल, तर ते आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. या महामार्गातून सरकार 50 ते 60 हजार कोटी रुपयांचा ढपला मारण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेत जाऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. ठेकेदार पोसण्यासाठी शेतकऱयांचा बळी आम्ही जाऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Comments are closed.