Ganeshotsav 2025 – शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाणाऱ्या वाटद MIDC ला गणपती देखाव्यातून विरोध

1) मुकुंद घवाळी यांनी उभारलेला देखावा
2) अजिंक्य निंबरे यांनी साकारला देखावा

राज्य सरकार वाटद पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या माथी मारत असलेल्या एमआयडीसीला प्रचंड विरोध होत आहे. गणेशोत्सवात ग्रामस्थांनी आपल्या घरातील गणपती बाप्पा समोर वाटद एमआयडीसी विरोधाचे देखावे साकारले आहेत. गावावर आलेले विनाशकारी संकट दूर कर अशी प्रार्थना देखाव्यातून केली आहे.

वाटद, कळझोंडी, मिरवणे, कोळीसरे गडनरळ आणि वैद्य लागवण या गावातील शेतकरी मीठ भाकर खाऊन सुखी असताना राज्य सरकारने त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवला आहे. वाटद एमआयडीसीची अधिसूचना जाहिर करून दोन हजार दोनशे एकर जमीन हडपण्याचा डाव एमआयडीसी रचत आहे. याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.

वाटद एमआयडीसी विरोधाचे पडसाद गणेशोत्सवातही उमटले आहेत. घरात गणपतीबाप्पा समोर ग्रामस्थांनी देखावे उभारले आहेत. वाटद एमआयडीसीच्या रूपाने कोकणावर आलेल्या संकटाचे वास्तव मांडणारा देखावा मुकुंद घवाळी यांनी साकारला आहे. एका बाजूला निसर्गरम्य वाटद पंचक्रोशी आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारी, कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारा धूर असे वास्तव मांडले आहे. कळझोंडी सडेवाडी येथील अजिंक्य निंबरे यांनी आमचं अस्तित्व, आमचं गावपण, आमची परंपरा, आमची संस्कृती, आमची स्वर्गा सारखी कोकण भूमी वाचवण्यासाठी आम्ही लढतोय. देवा गणराया..आमच्या गावावरती आलेलं हे विनाशकारी संकट कायमस्वरूपी हद्दपार होऊ दे. “एकच जिद्द वाटद एमआयडीसी रद्द” असा संदेश देणारा देखावा उभारला आहे. हे देखावे पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करत आहेत.

Comments are closed.