Ahilyanagar News- मढी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मढी यात्रा बंदोबस्त आणि दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मढी घाटात एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील चौघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर अहमदनगरसह पुणे, सातारा आणि जालना जिल्ह्यांत खून, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील वाढत्या घरफोडी आणि रोड रॉबरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक गस्त घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकाने 7 मार्च रोजी पाथर्डी परिसरात गस्त सुरू केली होती. यादरम्यान, आकाश मोहन डुकरे आणि विकास उर्फ सुनील म्हस्के हे आपल्या 5 ते 6 साथीदारांसह मढी ते पाथर्डी रोडवरील घाटात शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने तातडीने मढी घाटात धाव घेऊन सापळा रचला. अंधाराचा फायदा घेऊन काही संशयित इसम हातात घातक हत्यारे घेऊन उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने छापा टाकला असता, आकाश मोहन डुकरे (वय 26, रा. पाथर्डी), विकास उर्फ सुनील दत्तू म्हस्के (वय 25, रा. पाथर्डी), आदित्य दीपक बोरकर (वय 23, रा. राहुरी) आणि शरद श्रीरंग जाधव (वय 40, रा. अंबड, जि. जालना) या चौघांना जागीच पकडण्यात यश आले. मात्र, त्यांचे काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपींकडून 12 हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तपासादरम्यान या टोळीचा भयंकर गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. मुख्य आरोपी आकाश डुकरे याच्यावर पाथर्डी, जेजुरी आणि कराड येथे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विकास म्हस्के याच्यावर राहुरी, पाथर्डी आणि देहू रोड येथे ४ गुन्हे, तर आदित्य बोरकर याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंद आहेत. या सर्वांना पाथर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व 310(6) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

Comments are closed.