गावाला जायचं कसं? कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग ‘रिग्रेट’! सावंतवाडी एक्सप्रेसचे आरक्षण 35 सेकंदांत फुल्ल, हजारो गणेशभक्तांचा हिरमोड, आणखी गाड्या सोडण्याची मागणी
गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या जादा गाड्या आणि नियमित गाड्यांचे बुकिंग ‘रिग्रेट’ दाखवले जात असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांचा हिरमोड झाला आहे. गाड्यांची प्रतीक्षा यादी काही मिनिटांत ‘फुल्ल’ झाल्यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ‘रिग्रेट’चा मेसेज दिसत आहे. नवीन सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसचे आरक्षण अवघ्या 35 सेकंदांत प्रतीक्षा यादीत पोहोचले. त्यामुळे आता गावाला जायचं कसं, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला असून आणखी गणपती स्पेशल गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
गौरी-गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने जवळपास 360 जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच नियमित गाड्या गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने शेवटच्या क्षणी गावी जाण्याचा प्लान केलेल्या चाकरमान्यांची मोठी पंचाईत झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण 10 सप्टेंबरपासून पुढील सर्व दिवसांसाठी फुल्ल झाले आहे. या गाड्यांची प्रतीक्षा यादीदेखील फुल्ल झाल्याने आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ‘रिग्रेट’चा मेसेज पाहण्याचे नैराश्य हजारो चाकरमान्यांच्या पदरी पडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीदरम्यान सुरू केलेल्या गाडीच्या आरक्षणात तिकीट मिळेल या आशेवर असलेल्या प्रवाशांचीही घोर निराशा झाली. बुधवारी सकाळी अवघ्या 35 सेकंदांत सावंतवाडी एक्सप्रेसचे बुकिंग प्रतीक्षा यादीत गेले आणि पुढील दोन मिनिटांत रिग्रेट मेसेज दाखवू लागल्याची नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
या गाड्यांची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’मध्ये….
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर, द्वितीय एसी, तृतीय एसी श्रेणीमध्ये 10 व 11 सप्टेंबरला ‘रिग्रेट’ स्थिती.
तुतारी एक्स्प्रेस 10 सप्टेंबरसाठी स्लीपर कोचमध्ये 100 हून अधिक प्रतीक्षा यादी असून 11 सप्टेंबरला ‘रिग्रेट’ स्थिती.
सुरत-मडगाव एक्स्प्रेस आणि मंगळुरू एक्स्प्रेसमध्येही ‘रिग्रेट’ स्थिती.
दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस 11 व 12 सप्टेंबरला ‘रिग्रेट’ स्थिती.
नेत्रावती एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचची 10 सप्टेंबरची प्रतीक्षा यादी 300 च्या पुढे गेली, तर 11 सप्टेंबरनंतरची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’.
मांडवी एक्स्प्रेसचे सर्व श्रेणीतील डब्यांची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ स्थितीत.
रात्रभर रांगेत उभे, मात्र रिकाम्या हाताने घरी परतले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्सप्रेसचे आरक्षण बुधवारी सकाळी खुले झाले होते. या गाडीच्या तिकिटासाठी अनेक चाकरमान्यांनी मंगळवारी रात्रीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेलसह अनेक स्थानकांत रांगा लावल्या होत्या. मात्र काही सेकंदांत बुकिंग फुल्ल झाले. त्यामुळे प्रत्येक स्थानकात जेमतेम दोन-चार प्रवाशांनाच तिकीट मिळाले. बाकी प्रवासी रिकाम्या हाताने घरी परतले. 11 सप्टेंबरच्या बुकिंगला सर्वाधिक मागणी होती.
Comments are closed.