शुबमनच्या नेतृत्वावर गुरू गैरीचं मोठ वक्तव्य! 'धोनी' सारखं व्हायचं असेल तर ‘ही’ गोष्ट करावी लागेल!
शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. गिलने आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. पण, कर्णधार म्हणून त्याने फारशी प्रभावी कामगिरी केली नाही. त्याच्या नेतृत्वात भारताने 3 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे, तर उर्वरित 2 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.
आता माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक गैरी कर्स्टन (Gary Kirston) यांनी गिलच्या कर्णधारपदावर मौन सोडले आहे. गैरी कर्स्टन यांनी शुबमन गिलच्या नेतृत्वावर भाष्य करताना सांगितले की, सध्या फक्त सुरुवातीचे दिवस आहेत. मला वाटतं त्याच्यात अपार क्षमता आहे. एक कर्णधार म्हणून अनेक गोष्टी एकत्र सांभाळाव्या लागतात. गिल हा खेळाकडे विचारपूर्वक पाहणारा खेळाडू आहे. तो स्वतःही एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मात्र, नेतृत्व करताना अनेक गोष्टी योग्य प्रकारे हाताळाव्या लागतात आणि माझ्या मते मॅन मॅनेजमेंट म्हणजे संघातील खेळाडूंना योग्य प्रकारे हाताळणे हेही एका कर्णधारासाठी फार महत्त्वाचं असतं.
गैरी कर्स्टन हेच ते प्रशिक्षक होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 28 वर्षांनंतर 2011 मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी एम. एस. धोनी (MS Dhoni) संघाचा कर्णधार होता. कर्स्टन यांनी धोनीसोबत अनेक वर्षं काम केलं आहे.
त्यांनी सुचवलं की, गिलने धोनीकडून एक गोष्ट जरूर शिकायला हवी ती म्हणजे मॅन मॅनेजमेंट. धोनी एक अविश्वसनीय पद्धतीने संघातील खेळाडूंना सांभाळणारा कर्णधार होता. गिलने जर ही गुणवत्ता स्वतःमध्ये विकसित केली, तर तो भारतासाठी एक महान कर्णधार होऊ शकतो, असं कर्स्टन म्हणाले.
गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) प्रशिक्षकपदावरही गैरी कर्स्टन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी गौतम गंभीरचा मोठा चाहता आहे. मला आशा आहे की त्याला आवश्यक ती साथ मिळत असेल. खेळाडूंनी, जर अद्याप नाही, तरी लवकरच त्याच्याशी जुळवून घेतलं असेल आणि समजून घेतलं असेल की तो कसा काम करतो आणि संघासाठी काय मूल्य निर्माण करू शकतो.
Comments are closed.