नाथमंदिरातील अन्नछत्रात २ दिवसांपुरताच गॅस शिल्लक!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘नाथमंदिर संस्थानतर्फे ९ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘अन्नछत्रालया’त २ दिवस पुरेल एवढेच गॅस सिलिंडर शिल्लक आहेत. येथे दररोज २ हजार वारकरी नाथभक्तांना भोजन दिले जाते. दरम्यान, पुरेशा गॅस सिलिंडरच्या मागणीची नोंदणी करण्यात आली असून, अन्नछत्रालयाची सेवा अखंडपणे चालू राहणार आहे,’ अशी माहिती नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांनी दिली.

९ वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या पर्वावर नाथमंदिरात सुरू झालेल्या ‘अन्नछत्रालया’त दररोज २ हजार भुकेल्यांची क्षुधाशांती केली जाते. या अन्नछत्रात पोळी, भाजी, वरण-भात व एक गोड पदार्थ अशी अमर्याद थाळी असते. रोज अन्नदात्यांच्या हस्ते संत एकनाथ महाराज मंदिरात नैवेद्य दाखवून दुपारी १२ ते ४ या वेळेत आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. एकादशीला साबुदाणा खिचडी अथवा भगर अशी फराळाची व्यवस्था असते. कोरोना महामारीच्या काळातही संसर्गापासून बचाव करत अन्नदानाचे हे कार्य अखंडपणे चालू होते. आतापर्यंत एकूण तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांनी या नाथप्रसादाचा लाभ घेतला आहे. शांतिब्रह्म एकनाथांच्या मंदिरातील हा सेवाभावी उपक्रम नाथमंदिर संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. दररोज ११ हजार रुपये देणगीदाराचे नाव ‘अन्नदाता फलका’वर नमूद करून त्यांना सन्मानित केले जाते. अनेक शेतकरी व बागायतदार अन्नधान्य आणि भाजीपाला आदी पिकांची देणगी देतात. वारकरी, बाहेरून येणारे भाविक व परिसरातील निराधार व्यक्ती याचा लाभ घेत आहेत.

आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पैठणच्या अन्नछत्रालयात महिन्याला ६० गॅस सिलिंडर लागतात. त्यासाठी दर १० दिवसाला २० सिलिंडर खरेदी केले जातात. सध्या ४ सिलिंडर शिल्लक आहेत. कालच पैठणच्या गॅस एजन्सीकडे २० गॅस सिलिंडरची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नाथसंस्थानचे सेवेकरी तथा माजी नगरसेवक शहादेव लोहारे यांनी दिली. संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी कोणत्याही परिस्थितीत अन्नछत्र चालूच ठेवले जाईल. यासाठी इंधन व्यवस्थापन करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी संभाजी आडकुणे, नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी, हभप विठ्ठल शास्त्री चनघटे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. डॉ. गणेश मोहिते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Comments are closed.