“तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता..!” गाैतम गंभीरने सांगितलं दु:ख

भारतीय संघाने दमदार कामगिरी करत आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला. संघाने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली. संपूर्ण स्पर्धेत भारताने सातत्यपूर्ण खेळ केला आणि अंतिम फेरीत पोहोचला. निर्णायक सामन्यात न्यूझीलंडला तब्बल ९६ धावांनी पराभूत करून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेता बनला. या यशामागे भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर याची रणनीती आणि खेळाडूंवरील त्याचा विश्वास उत्तम होता.
टीम इंडियाने यापूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, गंभीरने टी-२० विश्वचषकासाठी एक विशेष रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. याच रणनीतीचा या स्पर्धेत भारताला फायदा झाला. तथापि, गंभीरने स्वतः कबूल केले की या मोठ्या विजयामागे काही कठीण क्षण होते.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर एएनआयशी बोलताना गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की न्यूझीलंड संघाविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध घरच्या मैदानावर मिळालेले कसोटी मालिका पराभव हे त्याच्या प्रशिक्षक कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होते. त्या पराभवांमुळे तो खूप निराश झाला होता.
गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या सुरुवातीच्या काळात, भारताला घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिकांमध्ये व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. या धक्कादायक निकालामुळे टीका आणि दबावही वाढला. त्या कठीण काळाची आठवण करून देत गंभीर म्हणाला, “मी त्या पराभवांना कधीही विसरणार नाही. त्यावेळी मला कोणीही फोन केला नव्हता.”
तथापि, या कठीण क्षणी एक व्यक्ती त्याच्या पाठीशी उभी राहिली. ती व्यक्ती जय शाह होती. गंभीर म्हणाला, “जय शाहने मला फोन केला आणि मला धीर दिला. त्याने मला सांगितले – ‘हिंमत धर, आम्ही तुझ्यासोबत आहोत.’ त्या शब्दांनी मला खूप आधार दिला.”
यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतरही, जय शाहने पुन्हा फोन केला आणि संघाला पाठिंबा दिला. गंभीरने स्पष्ट केले की या पाठिंब्यामुळेच आम्ही पुन्हा उभे राहिलो आणि आज विश्वचषक जिंकण्याचा प्रवास पूर्ण करू शकलो.
गंभीर पुढे म्हणाला की जय शाहच्या विश्वासामुळेच त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले आणि संघासाठी काम करत राहण्याचा आत्मविश्वास दिला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे स्वप्न धोक्यात आल्याचीही चर्चा आहे. तथापि, टी-२० वर्ल्ड कप विजयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अजूनही आनंदाचे वातावरण आहे.
Comments are closed.