IND vs ENG: ओव्हलच्या मैदानावर पिच क्युरेटरवर का भडकले गौतम गंभीर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भारतीय संघ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या (Anderson Tendulkar Trophy) शेवटच्या सामन्याची तयारी करत आहे. हा पाचवा आणि निर्णायक सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याच्या दोन दिवस आधी जेव्हा भारतीय संघ सराव करत होता, तेव्हा पिच क्युरेटर ली फोर्टिस आणि टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता या वादामागचं कारणही समोर आलं आहे.
सामन्याच्या दोन दिवस आधी टीम इंडिया (Team india) सरावात व्यस्त असताना, रन-अपसाठी खेळाडू मार्किंग करत होते. त्याचवेळी पिच क्युरेटर ली फोर्टिस काही सूचना देऊ लागले. त्यामुळे गौतम गंभीर चिडले आणि म्हणाले, तू फक्त ग्राउंड्समॅन आहेस. या वादात नंतर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक (Sitanshu Kotak) हस्तक्षेप करण्यासाठी आले आणि त्यांनी क्युरेटरला बाजूला नेऊन शांत केलं. पण गंभीर मात्र दूर उभं राहून अजूनही वाद करत होते. जेव्हा ली फोर्टिस यांनी रिपोर्ट करण्याची धमकी दिली, तेव्हा गंभीर म्हणाले हवे तिथे रिपोर्ट कर आणि संतापून ते त्यांच्यावर भडकले.
स्पोर्ट्स तक आणि दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीर नेट सेशन आणि तयारीसाठी मिळालेल्या व्यवस्थेवर नाराज होते. त्यातच पिच क्युरेटर ली फोर्टिस सतत सूचना देत होते. कोणता नेट वापरायचा, कुठे मार्किंग करायचं वगैरे. ज्यामुळे गंभीरचा संयम सुटला. ते वारंवार सांगत होते की, आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू, तू शिकवू नकोस.
सध्या तरी हा वाद निवळलेला आहे, पण आता बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) या प्रकरणावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.