“माफी मागण्याची गरज नव्हती”; अर्शदीप-मिशेल वादावर गौतम गंभीरची प्रतिक्रिया

भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला आहे. हा भारताचा सलग दुसरा आणि एकूण तिसरा टी-२० विश्वचषक विजेता ठरला. भारतीय संघाने जोरदार आणि आक्रमक क्रिकेट खेळून संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकमेव पराभवाव्यतिरिक्त, भारताने जवळजवळ प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी केली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंड संघावर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा मैदानावरील वातावरण काही काळासाठी तापले. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांच्यात किरकोळ वाद झाला.
ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या ११ व्या षटकात घडली. त्यावेळी डॅरिल मिशेलने अर्शदीपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. त्यानंतर, अर्शदीपने पाचव्या चेंडूवर वाइड यॉर्कर टाकला. मिशेलने चेंडू थेट अर्शदीपला दिला. मिशेल क्रीजच्या थोडा बाहेर उभा असल्याने अर्शदीपने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू स्टम्पवर न लागता थेट मिशेलकडे गेला.
या घटनेनंतर मिशेलला राग आला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये काही क्षण तणाव निर्माण झाला. त्यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागितली आणि ही घटना जाणूनबुजून घडली नसल्याचे स्पष्ट केले.
मात्र, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे मत थोडे वेगळे आहे. गंभीरच्या मते, अर्शदीपला माफी मागण्याची गरज नव्हती. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “देशाचे प्रतिनिधित्व करताना मैदानावर थोडी आक्रमकता दाखवणे स्वाभाविक आहे. गोलंदाजाला सलग दोन षटकार मारल्यानंतर प्रतिक्रिया देणे चुकीचे नाही. जरी त्याने माफी मागितली नसती तरी मला कोणतीही अडचण आली नसती.”
गंभीर पुढे म्हणाला की, अशा घटना पूर्वी घडत असत; मात्र, सोशल मीडियाच्या युगात अशा गोष्टींना मोठे स्वरूप दिले जाते. मैदानावरील खेळाडूंचे मुख्य ध्येय देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे आणि जिंकणे हे आहे.
Comments are closed.