बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलने सर्वांसमोर बोलणे खाल्ले, ऑस्ट्रेलियात भयंकर चिडला होता गौतम गंभीर!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये खळबळ उडाली आहे. कर्णधार रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार घेणं असो, किंवा रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती असो, या सर्व कारणामुळे भारतीय संघात ठिणगी पडली आहे. सिडनी कसोटीच्या आधी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही ठीक नाही, अशा बातम्या वारंवार येत होत्या. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलला सगळ्यांसमोर फटकारलं होतं. ही बाब आता बीसीसीआयच्या कानावर पडली आहे. वास्तविक, हा सगळा प्रकार मॉर्केलच्या उशिरा येण्यानं घडला होता. मॉर्केल काही वैयक्तिक कारणांमुळे प्रशिक्षणासाठी उशिरा पोहोचला होता. हीच बाब गौतम गंभीरला आवडली नाही. त्यामुळे त्यानं मॉर्केलला सर्वांसमोर फटकारलं होतं. सूत्राने सांगितले की, गंभीर शिस्तीबाबत खूप कडक आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आणि गौतम गंभीर यांच्यात सुरु असलेल्या मतभेदाबाबत प्रसार माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे आता बीसीसीआय टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफवर बारीक नजर ठेऊन आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी गौतम गंभीरसाठी ‘करो किंवा मरो’ असेल. जर संघाला या स्पर्धेत सुद्धा अपयश आलं, गंभीरच्या पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतात. तेव्हा बोर्ड त्याच्याबाबतीत कोणतं पाउल उचलेल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता रोहित शर्मा, रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल सारख्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्टार क्रिकेटपटू विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही.

हेही वाचा –

रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआयनं काय निर्णय घेतला?
आकाश चोप्रांनी भारतीय खेळाडूंना फटकारले, बीसीसीआयच्या या निर्णयाचं समर्थन
स्मृती मंधानानं एकाच खेळीत मोडले अनेक रेकॉर्ड, भारतासाठी अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

Comments are closed.