IND vs ENG: ‘आम्ही काहीही हलक्यात घेत नाही’, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी काय म्हणाले प्रशिक्षक गंभीर?
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team india) ज्या प्रकारे जिद्द दाखवली आणि जवळपास हरलेला सामना बरोबरीत आणला, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी युवा भारतीय संघाच्या जिद्दीला सलाम केला आहे. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam gambhir) यांनीही संघाचं भरभरून कौतुक केलं आहे. गंभीर म्हणाले, इंग्लंड दौरा नेहमीच कठीण असतो, पण या मालिकेत जशा प्रकारे क्रिकेट खेळलं गेलं, त्यावर प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अभिमान वाटावा असा आहे.
पाचव्या व शेवटच्या कसोटीपूर्वी गौतम गंभीर (Gautam Gambhir) सोमवारी इंडिया हाऊसमध्ये उपस्थित चाहत्यांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, इंग्लंड दौरा सोपा नसतो, कारण दोन्ही देशांमधील क्रिकेट इतिहास विसरणं शक्य नाही. आम्ही जेव्हा केव्हा ब्रिटनला आलो, आम्हाला नेहमीच जबरदस्त पाठिंबा मिळाला. आम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेत नाही. मागचे पाच आठवडे दोन्ही संघांसाठी खूप रोमहर्षक गेले. मालिकेत जशा प्रकारचे स्पर्धात्मक आणि दमदार क्रिकेट पाहायला मिळाले, त्याचा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला अभिमान वाटेल.
गंभीर पुढे म्हणाले, दोन्ही संघांनी जबरदस्त स्पर्धा केली आहे. आता आमच्याकडे अजून एक आठवड्याचा वेळ आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, जेणेकरून देशात आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटेल. पाचव्या टेस्टचा निकाल काहीही लागो, पण आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे.
याआधी इंग्लंडमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दुरईस्वामी यांनी सांगितले की, या मालिकेत भारतीय संघाने जशी जिद्द दाखवली, ती देशाच्या संघर्षशक्तीचं प्रतीक आहे. ही एक जबरदस्त मालिका ठरली आहे. सगळे सामने पाच दिवस चालले आणि अत्यंत रोमांचक होते. आमच्या संघाने जशी झुंज दिली, ती नव्या भारताच्या जिद्दीचं प्रतीक आहे. पाचव्या टेस्टचा निकाल काहीही लागला, तरी आम्हाला आमच्या संघाचा अभिमान आहे.
Comments are closed.