IND vs ENG: मी गिलच्या जागी असतो, तर स्टोक्सला नक्कीच ‘हा’ प्रश्न विचारला असता! सुनील गावसकर यांचं विधान
मॅंचेस्टर कसोटीत भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या शानदार खेळीचं सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कौतुक केलं. पण, त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजी वेळापत्रकावर आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कर्णधार बेन स्टोक्सवर (Ben Stocks) टीका केली.
चौथा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर गावसकर म्हणाले की, जर मी शुबमन गिलच्या (Shubman gill) जागी प्रेस कॉन्फरन्सला असतो, तर मी बेन स्टोक्सला काही ठाम प्रश्न विचारले असते. मॅंचेस्टर कसोटीत भारत पहिल्या डावात 358 धावांवर बाद झाला होता, त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 669 धावा करत 311 धावांची मोठी आघाडी घेतली होती. जो रूट आणि स्टोक्सने या डावात शतकं ठोकली. पण एवढ्या मोठ्या आघाडीच्या आणि धावसंख्येनंतरही सामना ड्रॉ झाला, हे लक्षात घेत गावस्करांनी इंग्लंडच्या पारी घोषित करण्याच्या वेळेवर टीका केली.
गावसकर म्हणाले, माझ्या मते इंग्लंडने खूप जास्त फलंदाजी केली आणि यामुळे त्यांना विजय गमवावा लागला. त्यांनी पुढे स्टोक्सच्या त्या जुन्या विधानाचाही उल्लेख केला, जिथे स्टोक्स म्हणाला होता की, ते 600 धावांचा पाठलाग करायला तयार आहेत. पण एजबॅस्टनमध्ये जेव्हा भारताने 600 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य दिलं, तेव्हा इंग्लंडला ते गाठता आलं नाही.
गावस्करांनी हेही सांगितलं की, गिल फार सभ्य स्वभावाचा आहे, त्यामुळे त्याने स्टोक्सला काही विचारलं नाही. पण मी असतो, तर नक्की विचारलं असतं की, 311 धावांची आघाडी का घेतली? 240-250 धावा झाल्यावरच पारी जाहीर का केली नाही? आणि स्टोक्सने शतक झाल्यानंतर आपल्या गोलंदाजांना अतिरिक्त एक तास का नाही दिला?
Comments are closed.