IND vs ENG: गावसकरांच्या गंभीर प्रश्नांमुळे वाद निर्माण, चाहत्यांनी वक्तव्य रोहित-विराटशी जोडलं

माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मॅंचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काही क्षणांतच सनी ग्रेटचे हे शब्द सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले आणि चाहत्यांनीही यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. गावसकरांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले, हे जाणून घेऊया.

महान फलंदाज गावसकरांचं मत आहे की, अंतिम अकरा खेळाडू कोण असावेत हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार कर्णधाराकडेच असावा, कारण मैदानावर रणनीती राबवायची जबाबदारी शेवटी त्याच्यावरच असते. त्यांच्या मते, कदाचित शुबमन गिलला (Shubman gill) प्लेइंग इलेव्हन निवडताना शेवटचं मत देण्याचा अधिकार नव्हता. गावसकर म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे कर्णधाराचा असावा आणि मुख्य प्रशिक्षकासह इतर कोणीही त्यावर प्रभाव टाकू नये.

सोनी स्पोर्ट्सवर गावसकर म्हणाले, शेवटी, ही कर्णधाराची टीम असते. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) सातत्याने संघाबाहेर ठेवण्यावरूनही चर्चेला उधाण आलं. त्यांनी असंही सुचवलं की, कदाचित शुबमनला शार्दूल संघात नको होता आणि त्याऐवजी तो कुलदीपला संघात पाहू इच्छित होता.

हा वाद सोशल मीडियावर अधिकच वाढला कारण काही चाहत्यांनी गावसकरांच्या वक्तव्याला गंभीर विरुद्ध कर्णधार, किंवा गंभीर विरुद्ध विराट-रोहित असा अर्थ दिला. काहींनी तर हेही लिहिलं की गंभीरमुळेच विराट आणि रोहित यांना जबरदस्तीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं लागलं.

याआधी गावसकरांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं होतं की, त्यांनी त्या गोष्टींचा उल्लेखच केलेला नाही. उलट, त्या गोष्टी सांगून मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी इतकंच म्हटलं होतं की, ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं दाखवण्यासाठी अनेक गोष्टी बाहेर येऊ दिल्या जात नाहीत. गावसकरांनी हेही सांगितलं की, जेव्हा ते स्वतः कर्णधार होते, तेव्हा निर्णय तेच घेत असत.

Comments are closed.