जीबीएस रुग्णसंख्या 183 वर, शहरात सर्वाधिक बाधित 20 ते 29 वयोगटातील

गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) संशयित रुग्णसंख्या 183 वर पोहोचली असून, यात सर्वाधिक 42 संशयित रुग्ण 20 ते 29 वयोगटातील आहेत. तर, 50 ते 59 वयोगटात 26 रुग्ण आढळून आले आहेत. 0 ते 9 वयोगटात 23 आणि 10 ते 19 वयोगटात 21 रुग्णांची नोंद झाली आहे.

आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येमध्ये पुणे महापालिका हद्दीतील 125, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 26, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश आहे. तर, 8 रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. या आजारातून बरे होण्याचेही प्रमाण वाढत असून, आतापर्यंत ८७रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 47 रुग्ण आयसीयूमध्ये, तर 21 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत सहा संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित भागातील घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पुणे महापालिका हद्दीतील 46 हजार 534, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 24 हजार 883, तर ग्रामीण भागातील 13 हजार 291 अशा एकूण 84 हजार 708 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, स्वच्छ व ताजे अन्न सेवन करावे, शिळे-अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.