सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रातील भाजप सरकारने मस्तवालपणे सांगितले होते की, आमच्या मंत्रिमंडळात राजीनामे होत नाहीत, पण धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता भाजप सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

जल्लोष सभेची सांगता झाल्यानंतर आदित्य ठाकरे तरुणांच्या गर्दीतून राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जात असताना सर्वांनी त्यांचे आभार मानले. या वेळी प्रसारमाध्यमांनीही आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ही मुंबईची ताकद आहे, तरुणांची आणि नव्या हिंदुस्थानची ताकद आहे, जिने दिल्लीतील हुकूमशाहीलाही झुकायला लावले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आज देश आणि तरुणाई जागृत झाली आहे. आजचा युवा थेट सरकारला प्रश्न विचारतो. जेन झींना कार्यक्रम देण्याची गरज नाही, तेच इतके सक्षम आहेत की, सरकारचाही कार्यक्रम करून टाकतात, अशी शब्दांत आदित्य ठाकरे यांनी नव्या पिढीचे कौतुक केले.

फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत

आपल्या भवितव्यासाठी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार का केला गेला, त्यांच्यावर एफआयआर का दाखल झाले असा सवाल करतानाच, आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्यावेत, गुन्हा दाखल करायचाय तर पेपरफुटीप्रकरणी प्रधान यांच्यावर करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.