आमच्या देशात या, भरपूर संधी आहेत! अमेरिकेने नाकारताच जर्मनीने हिंदुस्थानींसाठी उघडली दारे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसावरील शुल्कात प्रंचड वाढ केली आहे. तसेच अमेरिकेतून स्थलांतरीतांना कमी करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे इतर देशातून अमेरिकेत येणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, यासाठी त्यांनी शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा चीनने फायदा उचलत प्रतिभावंतांनी संधी देण्यासाठी के व्हिसाची घोषणा केली. तसेच अमेरिकेने नाकारताच जर्मनीनेही हिंदुस्थानींसाठी दारे उघडली आहेत.
जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी हिंदुस्थानींसाठी जर्मनीमध्ये नोकरीच्या उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे. आमच्या देशात या, आमच्याकडे खूप संधी आहे, असे म्हणत त्यांनी आमच्या देशात हिंदुस्थानींचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात लक्षणीय वाढ केल्यापासून भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांना वाढत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय भारतासाठी एक मोठी समस्या असल्याचे दिसून येते. मात्र, जर्मनीने भारतीयांना मदतीचा हात दिला आहे.
हिंदुस्थानातील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी मंगळवारी सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यात त्यांनी हिंदुस्थानी कार्यकुशल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की जर्मनीतील हिंदुस्थानी कामगारांबद्दल कौतुक करण्यासारखे काम करत आहेत. जर्मनीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये हिंदुस्थानींचा समावेश आहे. सरासरी भारतीय जर्मनीमध्ये जर्मन लोकांपेक्षा जास्त कमावतात. जास्त पगाराचा अर्थ असा आहे की भारतीय जर्मनीमध्ये जास्त काम करतात. ते इतरांपेक्षा जर्मन समाजात जास्त योगदान देतात, असे ते म्हणाले.
आम्ही कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतो, म्हणून आम्ही सर्वोत्तम लोकांना सर्वोत्तम नोकऱ्या देतो. आमचे स्थलांतर धोरण जर्मन कारसारखे आहे – विश्वासार्ह, आधुनिक आणि प्रतिसाद देणारे. आमचे धोरण अतिशय स्पष्ट आणि अचूक आहे, ज्यामध्ये कोणतेही विचित्रता नाही. अमेरिकेचा उल्लेख न करता, ते म्हणाले की आम्ही एका रात्रीत नियम बदलत नाही, असे सांगत त्यांनी सर्व उच्च कुशल भारतीयांना जर्मनीत येण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की जर्मनी त्याच्या स्थिर स्थलांतर धोरणांमुळे आणि आयटी, व्यवस्थापन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांसाठी उत्कृष्ट नोकरीच्या संधींमुळे एक अद्वितीय स्थान आहे.
Comments are closed.