जर्मन हेलिकॉप्टर सुरक्षा यंत्रणा भारतात तयार केली जाणार आहे
मेक इन इंडियासाठी महत्त्वाचा करार : एचएएल-हेन्सोल्ड्टदरम्यान भागीदारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि जर्मनीने बुधवारी दुबई एअरशो 2025 मध्ये हेलिकॉप्टर ऑब्सटॅकल अवॉयडेन्स सिस्टीम (ओएएस) निर्माण करण्यासाठी संयुक्त कार्यक्रमाची घोषणा केली आहे. भारताच्या वतीने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि जर्मनीची कंपनी हेन्सोल्ड्ट यात सामील होणार आहे. याचबरोबर भारत-जर्मनीदरम्यान संरक्षण उत्पादन क्षेत्रात हा सुमारे 3 दशकांनंतरचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक करार आहे.
या कराराच्या अंतर्गत भारतात ऑब्सटॅकल अवॉयडेन्स सिस्टीम (ओएएस) निर्माण करण्याचे काम एचएएलच्या प्रकल्पात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अशाप्रकारची यंत्रणा असती तर कदाचित खराब हवामानातही हेलिकॉप्टर सुरक्षित लँड करू शकले असते. जर्मनीची कंपनी हेन्सोल्ड्ट आता स्वत:च्या ओएएसची निर्मिती केवळ भारताच्या माध्यमातूनच करणार आहे आणि जर्मनीत याचे उत्पादन पूर्णपणे बंद केले जातेय.
हेलिकॉप्टर सुरक्षा यंत्रणा करार
प्रथम ही यंत्रणा लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्ये (एलसीएच) लावण्यात येणार आहे, मग अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरमध्ये (एएलएच) ती बसविली जाणार आहे. त्यानंतर अन्य प्लॅटफॉर्मसाठी देखील त्याचा वापर होईल. हे बिल्ड टू स्पेक मॉडेलवर संयुक्तपणे निर्माण करण्यात येणार आहे. या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण, डिझाइन आणि संयुक्त निर्मिती आणि भारतात उत्पादनाची तरतूद सामील आहे. याचबरोबर एचएएलला अन्य देशांमध्ये हेलिकॉप्टर्ससोबत ही यंत्रणा निर्यात करण्याचाही पूर्ण अधिकार प्राप्त होणार आहे.
यंत्रणेची आवश्यकता
हेलिकॉप्टर ऑब्सटॅकल अवॉयडेन्स सिस्टीमची भारताला सर्वाधिक आवश्यकता लडाख, सियाचीन, ईशान्य, वाळवंट आणि किनारी क्षेत्रांमध्ये आहे. हेन्सोल्ड्टमध्ये जर्मन संघीय सरकारची 25.1 टक्के हिस्सेदारी आहे.
ओएएसची क्षमता
हेलिकॉप्टर ऑब्सटॅकल अवॉयडेन्स सिस्टीम 1 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील अडथळ्यांचा शोध लावण्यास सक्षम आहे. अत्यंत पातळ तार, केबल, खांब, टॉवर किंवा भौगोलिक क्षेत्राचाही ही यंत्रणा शोध लावते. तारांच्या समांतर उ•ाण करताना ही यंत्रणा अनेकदा रडारही पकडू न शकणाऱ्या गोष्टींचा शोध लावते. धूळ, बर्फ, धुके आणि कमी प्रकाशातही वैमानिकाला मदत करण्यास ही यंत्रणा सक्षम आहे. यामुळे हेलिकॉप्टरला कुठल्याही प्रकारच्या धोक्याची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते.
Comments are closed.