जर्मनी दहशतवादावर भारताचे समर्थन करते
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तान पुरस्कृत दहशदवादाविरोधात भारत करत असलेल्या संघर्षाला जर्मनीने आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. भारताला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे, असे जर्मनीकडून स्पष्ट करण्यात आले असून काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न आहे, असेही प्रतिपादन जर्मनीने केले आहे. त्यामुळे भारताच्या भूमिकेला दुजोरा मिळालेला आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्री जोहान वाडफुल यांच्याशी चर्चा केली. वाडफुल यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेला समर्थन व्यक्त केले. पहलगाम येथील हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. हा हल्ला मानवतेला काळीमा फासणारा आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
काश्मीर द्विपक्षीय मुद्दा
काश्मीरचा प्रश्न तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्भवणारे इतर कोणतेही प्रश्न त्या देशांनी एकमेकांना सहकार्य करुन सोडवायचे आहेत. हे द्विपक्षीय प्रश्न आहेत, असेही वाडफुल यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे. या प्रश्नांमध्ये तिसऱ्या देशाने लक्ष घालू नये, हे भारताचे धोरण योग्य असून जर्मनीचे त्याला समर्थन आहे, असेही प्रतिपादन वाडफुल यांनी यावेळी केले.
संयुक्त पत्रकार परिषद
जयशंकर आणि वाडफुल यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. त्यात दोन्ही नेत्यांनी त्यांची द्विपक्षीय संबंध, पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तासंबंधीची कोणतीही समस्या भारत त्या देशासह सोडविण्यास समर्थ आहे. अन्य कोणत्याही देशाच्या मध्यस्थीची त्यासाठी आवश्यकता नाही, ही भारताची भूमिका एस. जयशंकर यांनी स्पष्ट केली.
Comments are closed.