जर्मनीतील रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा चाकू हल्ला; 18 जण जखमी, संशयित महिलेला अटक
जर्मनी ट्रेन स्टेशन हल्ला: जर्मनीतील हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जर्मनीच्या बिल्ड वृत्तपत्रानुसार, काल (शुक्रवारी) संध्याकाळी हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर झालेल्या चाकू हल्ल्यात 18 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी एका महिलेला संशयित म्हणून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे आणि इतर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत, असे बिल्डने वृत्त दिले आहे. तर हॅम्बुर्ग पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, जखमींची संख्या उपलब्ध झालेली नाही, परंतु “अनेक” व्यक्तींना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्टेशनवरील ट्रॅक 13 आणि 14 दरम्यान प्लॅटफॉर्मवरील लोकांना लक्ष्य केले. जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर हॅम्बुर्गच्या मध्यभागी स्थित, हे स्टेशन स्थानिक, प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाते. प्रादेशिक प्रसारक एनडीआरच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हॅम्बुर्ग स्टेशनवर वाट पाहणाऱ्या ट्रेनसमोर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा हल्ला झाला. या घटनेनंतर, प्लॅटफॉर्मवर एक हाय-स्पीड आयसीई ट्रेन दिसली ज्याचे दरवाजे उघडे होते, यावरून असे दिसून येते की, प्रवासी चढत असताना किंवा उतरत असतानाच हा हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर, शुक्रवारी संध्याकाळी स्टेशनवरील चार ट्रॅक बंद करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर झाला आणि त्यांचे मार्ग बदलण्यात आले.
हॅम्बुर्ग पोलिसांचे प्रवक्ते फ्लोरियन अबेन्सेथ यांनी घटनेबाबत माहिती देताना म्हटलं, “आतापर्यंत आमच्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीत की महिलेने राजकीय प्रेरणेने हे कृत्य केले असावे.त्याऐवजी, आमच्याकडे असे निष्कर्ष आहेत ज्यांच्या आधारे आम्ही आता विशेषतः ती मानसिक रूग्ण आहे का याचा तपास करत आहोत,” असे त्यांनी पुढे सांगितले. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळास्थळी सतर्क राहण्याचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत, या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिस संशयित महिलेची चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.