इराणमधून बाहेर पडा!
इराणमधील भारतीयांना माघारी परतण्याचे आदेश : धगधगत्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारकडून निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इराणमधील सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता, हिंसक निदर्शने आणि सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध मार्गांनी शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आता इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक किंवा पर्यटक अशा सर्वांना तातडीने मायदेशी परतावे लागणार आहे.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सूचना जारी केल्यानंतर दूतावास पातळीवरून तातडीची पावले उचलण्यात आली आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने बुधवारी एक निवेदन जारी केले असून त्यात ‘कागदपत्रे तयार ठेवा’ आणि ‘इराण देश तातडीने सोडा’ असे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ही सूचना भारत सरकारने 5 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विस्तार आहे. इराणमधील सतत बदलणारी परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांना व्यावसायिक उ•ाणांसह कोणत्याही उपलब्ध वाहतुकीच्या साधानांचा वापर करून इराण सोडण्याचा सल्ला सूचनापत्रातून देण्यात आला आहे.
इराणमधील सर्व भारतीय नागरिकांनी आणि अनिवासी भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, कोणतेही निषेध किंवा गर्दीचे क्षेत्र टाळावे आणि परिस्थितीवरील नवीनतम अपडेटसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. तसेच भारतीय नागरिकांना त्यांची सर्व प्रवास आणि इमिग्रेशन कागदपत्रे, पासपोर्ट नेहमी सोबत ठेवावीत आणि सहज उपलब्ध होतील अशी ठेवावीत असे आवाहन केले आहे. अलिकडच्या काळात इराणमध्ये व्यापक निदर्शने, हिंसाचार आणि सुरक्षा कारवाई सुरू झाल्यामुळे परदेशी नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणला लष्करी कारवाईची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहे.
आणीबाणी क्रमांक जारी केला
भारतीय दूतावासाने आपत्कालीन क्रमांक देखील जारी केले आहेत. भारतीय नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102 आणि +98932179359 या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधून अधिव व सविस्तर माहिती मिळवू शकतात, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमधील मृतांचा आकडा 2,572 वर
इराणच्या सरन्यायाधीशांनी देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये अटक केलेल्यांवर जलद खटले आणि फाशी देण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मृतांची संख्या 2,572 वर पोहोचल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी बुधवारी सांगितले. मृतांचा हा आकडा इराणमध्ये गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या कोणत्याही निदर्शने किंवा अशांततेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. हा हिंसाचार देशाच्या 1979 च्या इस्लामिक क्रांतीदरम्यान झालेल्या अराजकतेच्या आठवणी जागृत करणारा आहे.
Comments are closed.