जसे आहात तसे इराणमधून बाहेर पडा!
भारताकडून सूचना प्रसारित, मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इराणमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी उपलब्ध असलेल्या कोणत्याही मार्गाने त्वरित त्या देशाबाहेर पडावे, अशी स्पष्ट सूचना भारताने प्रसारित केली आहे. कोणत्याही क्षणी अमेरिकेचा इराणवर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे युद्धाला तोंड फुटू शकते. युद्धाचा किंवा सशस्त्र संघर्षाचा प्रारंभ झाल्यास इराणमध्ये राहणे किंवा तेथून बाहेर पडणे, हे दोन्हीही अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे, आत्ताच बाहेर पडण्यासाठी हालचाली करा, असे आवाहन केंद्र सरकारने भारतीयांना केले.
गेल्या काही दिवसांमधील ही दुसरी सूचना आहे. 5 जानेवारी 2026 या दिवशीही अशी सूचना प्रसारित करण्यात आली होती. इराणमध्ये सध्या भारताचे काही विद्यार्थी, पर्यटक, उद्योजक आणि व्यापारी अशा प्रकारचे नागरिक असू शकतात. त्या सर्वांसाठी भारत सरकारने ही सल्लासूचना प्रसारित केली आहे.
केव्हाही युद्धाची ठिणगी
इराणच्या आखातात आणि मध्य-पूर्वेत अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसंभार आणला आहे. विमानवाहू नौका, क्षेपणास्त्रे, युद्धनौका, बाँबफेकी विमाने, अत्याधुनिक ड्रोन्स आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा अमेरिकेने या भागात आणला आहे. इस्रायलही अमेरिकेला साहाय्य करीत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी इराणवर अमेरिकेचा हल्ला होऊ शकतो. तसे झाल्यास इराणही कदाचित प्रत्युत्तर देईल. त्यामुळे युद्धाचा प्रारंभ होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.
शांतता चर्चाही
एकीकडे युद्धाची सज्जता वाढविली जात असतानाच, दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चाही केली जात आहे. चर्चेत दोन्ही बाजू त्यांच्या धोरणावर अडून बसल्याने आत्तापर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही. इराणने युरेनियमच्या संपृक्तीकरणाचा प्रकल्प सोडून द्यावा असे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत तो कार्यक्रम सोडणार नाही, असे इराणचे म्हणणे आहे. याच मुद्द्यावर चर्चा अडकल्याने संभ्रम निर्माण झाला असून आता युद्ध हाच पर्याय दिसून येत आहे.
दशकातील सर्वात मोठी सज्जता
अमेरिकेने इराणच्या आखातात मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री आणली आहे. गेल्या दशकभरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी युद्धसज्जता अमेरिकेने केली नव्हती. त्यामुळे अमेरिका दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणवर ‘मर्यादित’ हल्ले केले जातील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. तथापि, अमेरिकेची सज्जता पाहता हल्ले किती प्रमाणात केले जातील, त्यांना इराणचे प्रत्युत्तर कशाप्रकारे आणि किती प्रमाणात मिळेल आणि अन्य देशांची भूमिका यांच्यावर बरेच काही अवलंबून आहे.
इराणचा इशारा
अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला, तरी प्रतिकार केला जाईल. युद्ध कितीही लांबले तरी इराण शरणागती पत्करणार नाही. आम्ही आमचे धोरण सोडणार नाही. आम्हीही युद्धासाठी सज्ज आहोत. आमच्यावर हल्ला केल्यास अमेरिकेच्या आस्थापनांवर हल्ला करु, असा इशारा आता इराणनेही दिला आहे.
इराणमध्ये पुन्हा जनआंदोलन
इराणमध्ये पुन्हा जनआंदोलनाचा प्रारंभ झाला आहे. त्या देशाच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक पुन्हा रस्त्यांवर उतरले असून प्रशासनाच्या विरोधात ते कृती करीत आहेत. प्रशासनाने कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवली असली, तरी आंदोलनाला लोकांचा पाठिंबा वाढत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी सज्जता वाढविलेली असतानाच इराणच्या प्रशासनाला देशांतर्गत असंतोषालाही तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांपूर्वी इराणच्या जनतेने केलेले उग्र आंदोलन प्रशासनाने दहशतवाद आणि सैनिकी बळाच्या जोरावर चिरडले होते.
युद्धाचे सावट अधिक दाट
ड अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्यासाठी सज्ज, इराणचाही इशारा
ड चर्चेत प्रगती नाही, मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करण्यासाठी मध्यस्थ सज्ज
ड इराणमध्ये सध्या जवळपास 5 हजार भारतीय, बाहेर पडण्याची धडपड
Comments are closed.