आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नाही, ‘बॉम्बे’ आहे, यामुळे मी खूश आहे! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे संतापजनक वक्तव्य

आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. यामुळे मी खूश आहे, असे संतापजनक वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.

आयआयटी मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

g केंद्रातील मोदी सरकारकडून देशाच्या इतिहासावर असलेले मुघल काळाचे आणि ब्रिटिश वसाहतवादाचे सावट पुसून टाकण्यासाठी नामांतराचा मार्ग अवलंबला जात आहे. मुंबईला ब्रिटिशांनी दिलेल्या ‘बॉम्बे’ या नावाबाबतही हीच भूमिका अपेक्षित आहे. राज्य सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’ हे नाव स्वीकारले असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी ‘बॉम्बे’ हे नाव कायम ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांच्या या कृतीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

आयआयटीच्या नावात मुंबईच हवे; शिवसेना आक्रमक

जितेंद्र सिंह यांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये. मुंबई ही मराठी माणसाची आहे. या मुंबईसाठी 107 लोकांनी बलिदान केले आहे. मुंबई फक्त नाव नाही, तर मराठी माणसाची एक भावना आहे. मराठी माणसाच्या रेटय़ामुळे पूर्वीच्या बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे मुंबईला बॉम्बे म्हणण्याची गरज नाही. सर्व संस्थांच्या नावातही बॉम्बे असेल तर मुंबई झाले पाहिजे. आयआयटीच्या नावातही बॉम्बेऐवजी मुंबईच असावे, असे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले.

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई असे नामकरण करण्यात यावे. यासंदर्भात केंद्र सरकार तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडे औपचारिक प्रस्ताव सादर करून नामांतर करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई युवक अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुढच्या वेळी मुंबईत मनसे सत्कार करू!

मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिनवणी करण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाहीत. आय.आय.टी. बॉम्बेचे ‘मुंबई’ केले नाही याबद्दल मी आभार मानतो, असे निर्लज्ज आणि बेशरम विधान जितेंद्र सिंह यांनी केले आहे. ते पुढच्या वेळी मुंबईत येतील तेव्हा त्यांचा मनसे सत्कार करू, असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.

Comments are closed.