अखेर मॅक्सवेलनं सुर गवसला, ऑस्ट्रेलियाने 2-1 ने जिंकली मालिका, रोमांचक सामन्यात आफ्रिकेचा पराभव
ऑस्ट्रेलियाने शनिवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 2 गडी राखून पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. केर्न्स येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एक चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य गाठले. सामन्यात सर्वाधिक 62 धावा करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्कार मिळाला.
173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात एडन मार्करामने हेडला (19) बाद केले. पुढील षटकात जॉश इंग्लिस शून्यावर बाद झाला. 11व्या षटकात वेना मफाकाने मिचेल मार्शला बाद केले. मार्शने 37 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावा केल्या.
कॅमेरून ग्रीन (9), टिम डेव्हिड (17), अॅरन हार्डी (1), बेन ड्वारश्विस (1) आणि नेथन एलिस (0) जलद गडबडीत बाद झाले. अशा कठीण प्रसंगी ग्लेन मॅक्सवेलने जबाबदारी घेत 36 चेंडूत नाबाद 62 धावा ठोकल्या. ज्यात त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांचा मारले. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा करत सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेसाठी कॉर्बिन बॉशने 3 बळी घेतले, तर रबाडा आणि मफाकाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मार्करामला एक यश मिळाले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेला आमंत्रित केले. केवळ 2 धावांवर कर्णधार एडन मार्कराम (1) बाद झाला. त्यानंतर प्रिटोरियसने रायन रिकेल्टनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाचव्या षटकात नेथन एलिसने जलद 24 धावा करणाऱ्या प्रिटोरियसला बाद केले. रिकेल्टनही 13 धावांवर माघारी परतला.
यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चौथ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. 12व्या षटकात एलिसने ब्रेविसला बाद केले. ब्रेविसने 26 चेंडूत 1 चौकार आणि तब्बल 6 षटकारांसह 53 धावा केल्या. स्टब्सने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्याला अॅडम झंपाने बाद केले. कॉर्बिन बॉश (1) आणि सेनुरन मुथुसामी (9) धावांवर बाद झाले. रासी व्हॅन डर डुसेनने शेवटपर्यंत नाबाद 26 चेंडूत 38 धावा केल्या. ज्यामुळे संघ 172 धाव संख्येपर्यंत पोहोचला.
ऑस्ट्रेलियाकडून नेथन एलिसने 3 विकेट्स घेतल्या, तर अॅडम झंपा आणि जॉश हेजलवुड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Comments are closed.