गोवा ड्रग्ज प्रकरणाचे ओडिशापर्यंत धागेदोरे; रायगडातील पुरवठादाराला अटक; गुन्हे शाखेची कारवाई – TMarathiNews
पणजी : गोव्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई तीव्र करताना पोलिसांनी आता ड्रग्ज जप्त करण्यापुरते मर्यादित न राहता त्याच्या पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी 10 लाख 5 हजार रुपये किमतीचे 10.07 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास करत पोलिसांनी ओडिशातील रायगडा येथील कथित ड्रग्ज पुरवठादार नकुला नाईक (29) याला अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशातील दोरागुडा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. तांत्रिक पाळत, सातत्यपूर्ण तपास आणि आंतरराज्यीय पोलिस समन्वयाच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.
आधी दोघांना घेतले होते ताब्यात
या प्रकरणातील सुरुवातीच्या कारवाईत गुन्हे शाखेने ओडिशातील बालेश्वर येथील रहिवासी गोकुला जेना (24) याला अटक केली होती. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा स्रोत शोधण्यासाठी पोलिसांनी तपास पुढे सुरू ठेवला.
या तपासादरम्यान ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला, याचा शोध घेण्यात आला. त्यातून रायगडा येथील नकुला नाईक याचे नाव समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ओडिशा पोलिसांशी समन्वय साधून त्याला अटक केली.
आंतरराज्यीय तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न
गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढविली आहे. ड्रग्ज जप्त केल्यानंतर त्याचा पुरवठादार, वितरणाची साखळी आणि त्यामागील इतर व्यक्तींचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करून गोव्यात कार्यरत असलेले आंतरराज्यीय पुरवठा जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गुन्हे शाखा कटिबद्ध असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आणखी कोणाचे संबंध उघड होतात आणि ड्रग्ज पुरवठ्याची साखळी कितपत व्यापक आहे, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.
Comments are closed.