देव शत्रूचे साधन नाही: उच्च न्यायालय

वृत्तसंस्था/चेन्नई

ईश्वराच्या नावावर होणाऱ्या राजकारणावर मद्रास उच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. ईश्वर शत्रुत्वाचे साधन नाही, तर एकता, शांती आणि अध्यात्मिक कल्याणाचे प्रतीक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.  भगवान गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापान करण्यासाठी दाखल याचिकांवर न्यायालयाने ही टिप्पणी करत अनेक याचिका श्रद्धेने नव्हे तर अहंकाराने प्रेरित असल्याचे नमूद केले. हे न्यायालय काही प्रकरणांमध्ये अंतर्निहित प्रेरणांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. बहुतांश याचिका धार्मिक उद्देशासाठी अहंकार आणि आर्थिक प्रभाव जमविण्याच्या इच्छेने प्रेरित असल्याचे जाणवते. ईश्वर एकता, शांतता आणि अध्यात्मिक कल्याणाचे प्रतीक असल्याचे न्यायाधीश बी. पुगलेंधी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

गल्ल्यांमधील मंदिरं उपेक्षित

एकीकडे गल्ल्यांमध्ये असलेली मंदिर वर्षभर उपेक्षित राहतात, तर सणांदरम्यान विशाल मूर्ती बसविण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात असल्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. हा विरोधाभास भाविकांना आत्मचिंतन करण्यासाठी प्रेरित करतो. खरी भक्ती भव्यतेत नाही, तर पूजास्थळांबद्दल निरंतर श्रद्धा आणि देखभालीत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

अंतिम क्षणी अर्ज का?

अनेक याचिकाकर्त्यांनी मूर्ती स्थापित करण्यासाठी अंतिम कालावधीत अर्ज केले होते, यामुळे अनुमती दिल्यास पर्यावरण आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या आवश्यकतांचे पालन केले जाणार की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे फारच कमी वेळ होता. अंतिम क्षणी प्राप्त अर्जांवर विचार केला जाऊ शकत नाही, खासकरून सार्वजनिक स्थापनेत अनेक विभागांदरम्यान समन्वयाची आवश्यकता असेल असे न्यायालयाने म्हटले आहे. याचबरोबर न्यायालयाने अशा अर्जांवर निश्चित पद्धतीने निर्णय न घेणे आणि निवडक अनुमती देण्यासाठी अधिकाऱ्यांनाही  फटकारले आहे.

Comments are closed.