सोन्या-चांदीचे भाव घसरले
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ग्राहकांना ‘लाभ’ : चांदी दर 17,251 रुपयांनी घसरला : सोन्यातही 6,472 रुपयांची घसरण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, मुंबई
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. ‘एमसीएक्स’वर सोन्याच्या दरात 5,200 रुपयांची घसरण झाल्यामुळे किंमत प्रतितोळा 1,50,000 रुपयांच्या खाली आली. चांदीच्या दरातही सुमारे 15,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे हा दर 2,30,000 रुपये प्रतिकिलोच्या खाली आला आहे. या घसरणीचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होत आहे. गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करत ‘लाभ’ उठविला.
जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर वायदे बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. गुरुवारी दुपारी 3:53 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने दर 6,472 ने घसरून प्रति 10 ग्रॅम 1,47,078 रुपयांवर स्थिरावला. दरम्यान, चांदीच्या भावात 17,251 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली. ‘गुड रिटर्न्स’नुसार, दिल्लीत गुरुवारी 24-कॅरेट सोन्यासाठी प्रतिग्रॅम 15,206 रुपये इतका भाव होता. तर मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी प्रतिग्रॅम 15,191 रुपये दर्शविण्यात आला होता. वेगवेगळ्या राज्य व शहरनिहाय हा दर वेगवेगळा असतो.
युद्ध, आंतरराष्ट्रीय तणाव आणि जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे सोने आणि चांदीच्या दरात वेगाने चढ-उतार होऊ शकतात. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी आणि किमतीतील अचानक चढ-उतारांच्या आधारावर घाईघाईने गुंतवणूक करणे टाळावे, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.
Comments are closed.