वैदिक काळापासून भारतात सोन्याचे नाणी

नवे पुरातत्वीय संशोधन, अनेक जुने समज निघणार मोडीत, आपला इतिहास प्रत्यक्षात अधिक पुरातन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात सुवर्णनाण्यांच्या उपयोगाला ‘कुशाण’ काळापासून प्रारंभ झाला, अशी बहुतेकांची समजूत आहे. तथापि, आता नव्या संशोधनानुसार आणि ठोस पुराव्यांच्या आधारावर हा समज खोटा ठरणार आहे. भारतात वैदिक काळापासूनच सुवर्णमुद्रांचा (सोन्याची नाणी) उपयोग चलन आणि व्यापारासाठी होत होता, असे या नव्या संशोधनात आढळून आले असून आपला इतिहास आपल्याला शिकविला जातो, त्यापेक्षा पुष्कळ जुना आहे, हे देखील आता सप्रमाण सिद्ध होत आहे.

कुशाण लोक भारतात येण्यापूर्वी 3 हजार वर्षांहूननही अधिक काळापासून भारतात सोन्याच्या नाण्यांचा उपयोग केला जात होता. ही नाणी चलन म्हणून खरेदी-विक्रीसाठी, व्यापारासाठी, तसेच धार्मिक कारणांसाठी उपयोगात आणली जात होती. या सुवर्णमुद्रांना ‘निष्क’ असे संबोधले जात होते, असे प्रतिपादन भारताचे ज्येष्ठ पुरातत्वशास्त्र तज्ञ बी. आर. मणी यांनी संशोधनाच्या आधारावर केले आहे.

इतिहास नव्याने लिहावा लागणार

या संशोधनामुळे भारताचा आर्थिक आणि व्यापार इतिहास नव्याने लिहावा लागेल, अशी स्थिती आहे. भारतात धातूशास्त्राचा विकास आपण समजतो त्यापेक्षा अनेक सहस्र वर्षे प्रचीन काळीच झाला आहे. सिंधू संस्कृती, वेदकाळ आणि त्यानंतरच्या पुरातन काळापासून भारतात सुवर्ण आणि इतर मौल्यवान धातूंचे उत्पादन केले जात होते. तसेच त्यांची नाणी पाडण्याचे शास्त्रही विकसीत करण्यात आले होते, हे या संशोधनावरुन स्पष्टपणे आढळते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्लीतील कार्यक्रमात भाषण

मणी यांनी शुक्रवारी दिल्लीतील राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय सभागृहात अनेक विद्वान पुरातत्वशास्त्र संशोधकांसमोर हे प्रतिपादन केले. इसवीसनाच्या प्रारंभी कुशाण भारतात आले आणि त्यांनी येथे साम्राज्य स्थापन केले. या साम्राज्यात प्रथम सुवर्णमुद्राच्या उपयोगाला प्रारंभ झाला. त्यापूर्वी भारताला सोन्याचे नाणे माहीत नव्हते, असा इतिहास शिकविला जातो. तथापि, त्यापूर्वी कमीतकमी 3 सहस्र वर्षांपासून भारतात सुवणमुद्रांचा उपयोग केला जात होता. सिंधू-सरस्वती संस्कृती काळातील अनेक सुवर्णगोल संशोधनात सापडले आहेत. ती त्या काळातील नाणी आहेत, हे आतापर्यंत ज्ञात नव्हते. तथापि, ती त्याकाळातील नाणीच असून ती वर्तुळाकृती होती, हे ठोस पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. भारतात हे शास्त्र इसवीसनपूर्व 4,000 वर्षे विकसीत झाले होते. याचाच अर्थ असा की, गेल्या सहा ते सात हजार वर्षांपासून भारतात सुवर्णमुद्रांचा उपयोग केला जात आहे.

‘निष्क’ काय आहे…

‘निष्क’ हे वर्तुळाकृती आणि चकतीच्या आकाराचे सोन्याचे नाणे आहे. त्याच्या मध्यभागी एक छिद्र आहे. अनेक दशकांपूर्वीच उत्खननात त्यांचा शोध लागला होता. तथापि, तो आभूषणांचा किंवा दागिन्यांचा प्रकार असावा, असा समज होता. मात्र, नव्या संशोधनानुसार ही आभूषणे नसून नाणी आहेत, हे समजले आहे. इतकेच नव्हे, तर ज्यांच्याकडे 100, 1,000, 10,000 किंवा त्यांच्यापेक्षा अधिक ‘निष्क’ आहेत, त्यांना धनवान मानले जात होते, असे प्रतिपादन मणी यांनी केले.

इतिहास केवळ स्वप्नील कल्पना नाही

भारताच्या पुरातन साहित्य ग्रंथांमध्ये सातत्याने सुवर्णाचा उल्लेख येतो. ते केवळ त्या काळाच्या भारतीयांचे स्वप्नरंजन असून असे सोने भारतात प्राचीन काळी कधीच नव्हते, असे आपल्याला शिकविले जाते. तथापि, ही भ्रामक शिकवण आहे. आपला इतिहास केवळ कविकल्पना किंवा स्वप्नरंजन नाही. सुवर्णभैभव या भारतभूमीने सहस्रावधी वर्षांपूर्वीपासून अनुभवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संशोधनाचा परिणाम काय होणार…

या संशोधनामुळे भारताच्या प्राचीन इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागेल, असे अनेक तज्ञांचे मत आहे. सहा ते सात सहस्र वर्षांपूर्वीपासूनच भारतात धातूशास्त्र प्रगत अवस्थेत होते. सुवर्ण आणि इतर मौल्यवान धातूंचे उत्पादन भारतात त्याकाळापासूनच होत होते. त्याकाळातील लोक धातूशास्त्र आणि इतर शास्त्रे, कला आणि विज्ञानात आपली जी समजूत करुन देण्यात आली आहे, त्यापेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात प्रगत होते, हे या संशोधनाने सिद्ध केल्याने इतिहासासंबंधीच्या आपल्या प्रचलित कल्पना आणि संकल्पना सोडाव्या लागणार आहेत.

इतिहासावर नवा प्रकाश…

ड बी. आर. मणी यांच्या संशोधनामुळे भारताच्या इतिहासावर नवा प्रकाश

ड सहा ते सात सहस्र वर्षांपूर्वीपासूनच भारत हा समृद्ध देश म्हणून प्रसिद्ध

ड सुवर्णचलनाचा उपयोग भारतात अनेक सहस्र वर्षांपासूनच आहे प्रचलित

ड नव्या संशोधनामुळे भारताच्या प्राचीन इतिहासावर नव्याने विचार आवश्यक

Comments are closed.