सोनं झालं महागडं; एका तोळ्याची किंमत किती?
टॅरिफ तसेच जागतिक बाजारामध्ये मागणी वाढल्याने मंगळवारी एकाच दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी 5 हजार 80 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सोने 1,12,750 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.

तर चांदीचे भावही 2,800 ने उसळून विक्रमी 1,28,800 रुपये प्रतिकिलो (सर्व करांसह) वर पोहोचले आहेत. मागील व्यवहारात चांदीचा दर 1,26,000 प्रतिकिलो होता.

जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेले दर मंगळवारी तब्बल 1,442 रुपयांनी वाढले.

त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 13 हजार 197 रुपयांवर पोहोचले. फक्त एका दिवसात दीड हजार रुपयांच्या आसपास वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

1 सप्टेंबर रोजी जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 8 हजार 459 रुपये इतके होते. मात्र, त्यानंतर दररोजच्या चढ-उतारांमध्ये वाढीचाच कल दिसला.

सोमवारी सोन्याचे दर 1 लाख 11 हजार 755 रुपयांवर गेले होते. त्यानंतर मंगळवारी जवळपास दीड हजार रुपयांची भर पडून नवीन उच्चांक प्रस्थापित झाला.

यामुळे 1 ते 9 सप्टेंबर या कालावधीत सोन्याने तब्बल 4738 रुपयांची झेप घेतली आहे. दरवाढीमुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या काहीशी घटल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात.

सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने लहान प्रमाणातील ग्राहकांनी खरेदी टाळल्याचे चित्र दिसते. तरीदेखील, दरवाढीमुळे आर्थिक उलाढाल फारशी घटलेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

चांदीतदेखील मंगळवारी चढा-उतार दिसून आला. गेल्या आठवडाभरापासून स्थिर असलेले दर मंगळवारी 1030 रुपयांनी वाढले. त्यामुळे जीएसटीसह चांदीचे दर प्रति किलो 1 लाख 29 हजार 780 रुपयांपर्यंत पोहोचले.

आठवडाभर स्थिर असलेली किंमत अचानक वाढल्याने चांदीची मागणी देखील काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी ग्रॅमने होणाऱ्या खरेदीत सुमारे 30 टक्के घट झाली आहे.

परंतु, परंपरागत सण-उत्सवांचा हंगाम सुरू असल्याने सोने-चांदीच्या खरेदीला पूर्णविराम लागलेला नाही. दररोज नवे उच्चांक गाठणाऱ्या सोन्यामुळे ग्राहकांची मोठी परीक्षा सुरू आहे.
येथे प्रकाशित: 10 सप्टेंबर 2025 11:10 एएम (आयएसटी)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.