सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ, चांदीचे दर 7000 रुपयांनी वाढले, सोनं किती रुपयांनी महागलं?
नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आज (2 जानेवारी) पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 7000 रुपयांपेक्षा अधिक रुपयांची तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11.25 वाजता 5 मार्चच्या वायद्याचे चांदीचे दर 7468 रुपयांनी वाढून 2,43,341 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात देखील 5 फेब्रुवारीच्या वायद्याचे दर 1011 रुपयांनी वाढून 136815 रुपये एक तोळा इथंपर्यंत पोहोचले आहेत.
कमोडिटी मार्केटच्या जाणकारांच्या मते चांदीचे दर 2025 मध्ये 150 टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरात देखील 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदी उच्चांकावर पोहोचली आहे. सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर राहण्याचं कारण गुंतवणूकदार सतर्क आहेत, असं जाणकारांनी म्हटलं. जेव्हा सोने आणि चांदीच्या दरात तेजी येते तेव्हा विक्री वाढते. आणि जेव्हा दर पडतात तेव्हा गुंतवणूकदार खरेदी करतात.
Silver Rate : चांदीच्या दरात वाढ का होतेय?
चीननं 1 जानेवारी 2026 पासून चांदीच्या निर्यातीवर नियम केले आहेत. सरकारी परवान्यानंतरच चांदी दुसऱ्या देशात निर्यात करता येणार आहे. याशिवाय कोणत्याही कंपनीला चांदीची निर्यात करणं मंजूर नाही. चीन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चांदी 60 ते 70 टक्के नियंत्रित करते. चीनच्या या निर्णयामुळं जागतिक स्तरावर चांदीची मागणी वाढणार आहे.
सोने दरानं 140465 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तिथून दर कमी होत 136815 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीच्या दरानं 254174 रुपयांचा उच्चांक गाठला होता. जो कमी होऊन 243341 रुपयांवर आला आहे.
Gold Rate in Market : सराफा बाजारातील दर
चांदीच्या दरात सराफा बाजारात 5656 रुपयांची वाढ होऊन ते 234906 रुपये किलोवर पोहोचले आहेत. चांदीचे जीएसटीसह दर 241953 रुपये किलो आहेत. सोन्याच्या दरात देखील 954 रुपयांची तेजी आली आहे. तर, सोन्याचा जीएसटीसह दर 138447 रुपये प्रति तोळा इतका आहे. आजचा सोन्याचा जीएसटी शिवायचा दर 134415 रुपये तोळा इतका आहे.
सोन्याचा 23 कॅरेट सोन्याचा दर 950 रुपयांनी वाढून 133877 रुपयांवर पोहोचला. 22 कॅरेट सोन्याचा दर 874 रुपयांनी वाढून 123124 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 715 रुपयांनी वाढून 100811 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 558 रुपयांनी वाढून 78633 रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप- शेअर बाजार, परस्पर फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या हिशेब गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.