उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त

जागतिक संकेतांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत झपाट्याने घसरण सुरूच आहे. दिवाळीनंतर सोने चांदीमध्ये सुरू असलेली घसरण मंगळवारीही कायम होती. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण दिसून आली. मंगळवारी एका दिवसात सोन्याच्या किमती ३,००० रुपयांनी घसरल्या, तर चांदीच्या किमतीही ३,००० रुपयांनी घसरल्या. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणामामुळे ही घसरण होत आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होण्याची अपेक्षा आणि मजबूत अमेरिकन डॉलरमुळेही या धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावरून मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. सोने त्याच्या विक्रमी उच्चांकावरून १३,००० रुपयांनी घसरले आहे, तर चांदीच्या किमती २९,००० रुपयांनी घसरल्या आहेत. मंगळवारी व्यवहार सुरु होताना वायदे बाजारात (एमसीएक्स) सोने १,२०,१०६ प्रति १० ग्रॅमवर होते. तर चांदी १,४२,३६६ प्रति किलोग्रॅमवर होती. बाजार बंद होताना, सोने ₹१,१८,४६१ प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. तर चांदी १.३६% कमी होऊन ₹१,४१,४२४ प्रति किलोग्रॅमवर आली. मात्र, बुधवारी वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी वाढ दिसून येत आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा विक्रमी उच्चांक १.३२ लाखांपेक्षा जास्त होता, तो आता १.१८ लाखांपर्यंत घसरला आहे. ही त्याच्या विक्रमी उच्चांकावरून १३,००० पेक्षा जास्त घसरण आहे. तर चांदीचा दर प्रति किलोग्रॅम १.७० लाख या विक्रमी उच्चांकावरून प्रति किलोग्रॅम 1.41 लाखांवर आला आहे. परिणामी, चांदीची किंमत त्याच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे २९,००० ने घसरली आहे.

Comments are closed.