नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ मार्चपासून नागपूर आणि गोवा विमानसेवा होणार सुरू; पाहा वेळापत्रक

नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावरून आता नागपूर आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या या बहुप्रतीक्षित सेवेला येत्या ३१ मार्चपासून प्रारंभ होणार असून, यामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.

या नवीन विमानसेवेचे संचालन ‘स्टार एअर’ ही विमान कंपनी करणार आहे. ही सेवा आठवड्यातील सहा दिवस उपलब्ध असेल, तर केवळ शुक्रवारी ही विमानसेवा बंद राहील. या नव्या मार्गांमुळे आता नांदेडहून मुंबई आणि गोवा गाठणे अवघ्या तासभराच्या अंतरावर येणार आहे.

विमानाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

नांदेड ते नागपूर: सकाळी ११:२० वाजता नांदेडहून उड्डाण, दुपारी १२:१० वाजता नागपूरला आगमन.

नागपूर ते नांदेड: दुपारी १२:४० वाजता नागपूरहून उड्डाण, दुपारी १:३० वाजता नांदेडला आगमन.

गोवा (मोपा) ते नांदेड: सकाळी ९:३० वाजता गोव्याहून उड्डाण, सकाळी १०:५० वाजता नांदेडला आगमन.

नांदेड ते गोवा (मोपा): दुपारी २:०० वाजता नांदेडहून उड्डाण, दुपारी ३:२० वाजता गोव्याला आगमन.

या विमानसेवेचा लाभ केवळ नांदेडकरांनाच नव्हे, तर शेजारील परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होणार आहे. नांदेडहून सध्या पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, गाझियाबाद, आदमपूर आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता यात नागपूर आणि गोव्याची भर पडल्याने व्यापारी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.

Comments are closed.