ठाणेकरांसाठी खुशखबर !! कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे

मुंबई मेट्रो : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या भागांना जोडण्यासाठी मुंबई मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामुळे दररोज गर्दीच्या लोकल गाड्यांवर अवलंबून असणाऱ्या लाखो प्रवाशांना आता मेट्रोचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या संदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी कशी वाढवता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांना जोडण्यासाठी सध्या मुंबई मेट्रो लाईन 5 चे बांधकाम सुरू आहे. मात्र, या मार्गाचे आणखी विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावानुसार दुर्गाडी नाका ते चिखलोली रेल्वे स्थानकावरून कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथमार्गे मेट्रो नेण्याचे नियोजन आहे. तसेच दुसऱ्या पर्यायात हा मार्ग बदलापूरपर्यंत वाढविण्याची शक्यताही तपासली जात आहे. याशिवाय दुर्गाडी ते टिटवाळा अशी स्वतंत्र मेट्रोही प्रस्तावित करण्यात आली आहे. या विस्तारामुळे सध्या उपनगरीय लोकलवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो

दरम्यान, कल्याण ते तळोजा दरम्यान मुंबई मेट्रो लाईन 12 विकसित केली जात आहे. या प्रकल्पात खांब उभारणी व स्थानक उभारणीची कामे सुरू आहेत. हा मार्ग शिळफाटा ते मुंब्रा आणि पुढे कळव्यापर्यंत वाढवण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो

कांजूरमार्ग ते बदलापूर या मुंबई मेट्रो मार्ग 14 च्या प्रस्तावित मार्गावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. हा कॉरिडॉर मुंबईच्या पूर्व उपनगरांना ठाणे जिल्ह्यातील रहिवासी भागांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे या प्रकल्पाचे नियोजन लवकर पूर्ण करून कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मेट्रो प्रकल्पाबरोबरच बदलापूर काटई रस्त्याचे रुंदीकरण, रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे, ऐरोली-काटई फ्रीवे बोगदा प्रकल्पाचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच कल्याण पूर्व यू-टाईप रोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली. मेट्रोच्या प्रस्तावित विस्ताराला मंजुरी मिळाल्यास ठाणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था बळकट होण्याची शक्यता आहे. कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर यांसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.

Comments are closed.