मालगाडीचे इंजिन बिघडले; प्रवासी एक तास लटकले, वासिंद – आसनगावदरम्यान तांत्रिक लोच्या
मध्य रेल्वेच्या वासिंद आसनगाव स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनने मान टाकली. डाऊन मार्गावरील मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे लोकलसह लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. साडेतीनच्या सुमारास खर्डी येथून पर्यायी इंजिनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर एक तासाने रेल्वे सेवा पूर्ववत झाली.
मध्य रेल्वेवर वारंवार लोकल सेवेचा बोजवारा उडत असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ठप्प होणारी मध्य रेल्वेची लोकल सेवा आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली. टिटवाळा ते कसारादरम्यान सिग्नल यंत्रणा फेल, इंजिनमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अश वारंवार घडणाऱ्या प्रकारांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रविवारी अडीचच्या सुमारासदेखील वासिंद-आसनगाव स्थानकादरम्यान डाऊन मार्गावन मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आसनगाव-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल व लांबपल्ल्यांच्या गाड्यांचा तब्बल तासभर खोळंबा झाला. खर्डीवरून पर्यायी इंजिनची व्यवस्था करण्यात आल्यानंतर रेल्वे सेव साडेतीनच्या सुमारास पूर्ववत झाली.
रेल्वे प्रशासन गंभीर नाही
वासिंद ते कसारा या भागात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून रेल्वे प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे उमेश विशे यांनी केला आहे. प्रवाशांना सातत्याने होणारा त्रास टाळण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी इंजिन उपलब्ध ठेवणे आवश्यक असतानाही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
Comments are closed.