गूगल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल

विशाखापट्टण येथे एआय हब साकारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुंदर पिचाई यांची मोठी चर्चा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जगप्रसिद्ध गुगल कंपनी भारतात 15 अब्ज डॉलर्सची (साधारणत: सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून आंध्र प्रदेशातली विशाखापट्टण येथे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान केंद्र साकारणार आहे. या महाप्रकल्पात भारताचे आघाडीवरचे उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योगसमूहही योगदान करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही भारतात या क्षेत्रातील सर्वोच्च तंत्रज्ञान आणणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सविस्तर चर्चा केली आहे.

आगामी पाच वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असून याच कालावधीत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. भारताच्या उद्योगक्षेत्राला साहाय्य करणे आणि भारतभर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा लाभ पोहचविणे, हा या प्रकल्पाचा हेतू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विशाखापट्टण शहर हे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान केंद्र होणार आहे. या केंद्रात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानविषयक संशोधनही होणार असून त्यामुळे भारतातील कुशल तंत्रज्ञ आणि संशोधकांना भारतातच आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे काम उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलच्या या निर्णयाचे स्वागत केले असून भारत सरकारच्या वतीने पूर्ण सहकार्याची हमी दिली आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान किंवा एआयच्या क्षेत्रात भारताला उच्च स्थान मिळवून देण्याची कामगिरी हे केंद्र करु शकणार आहे.

डिजीटल मागणी पूर्ण होणार

भारतात सध्या डिजीटल तंत्रज्ञानाची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्र सरकारनेही डिजीटल व्यवहारांसाठी अनुकूल धोरण स्वीकारले आहे. हा प्रकल्प भारताच्या या मागण्या आणि महत्वाकांक्षा पूर्ण करणारे एक महाद्वार म्हणून कार्य करेल, आणि भारतात जी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान क्रांती होऊ घातली आहे, तिची पायाभरणी या प्रकल्पामुळे होऊ शकते, असा तज्ञांचा विश्वास आहे.

बारा देशांमध्ये प्रकल्प

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकासात अग्रणी असणाऱ्या गुगल या कंपनीने भारतासह 12 देशांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प स्थापन करण्याची योजना केली असून भारतातील प्रकल्प त्यांच्यातील सर्वात मोठा असल्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान हे जगाचे भविष्य आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाला या तंत्रज्ञानाची माहिती असणे अनिर्वाय होणार आहे. अशा स्थितीत भारतही या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत असून हा प्रकल्प या प्रयत्नाला फार मोठे बळ आणि प्रोत्साहन देईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

भारत एआय शक्ती कार्यक्रम

नवी दिल्ली येथे आयोजित ‘भारत एआय शक्ती’ या भव्य कार्यक्रमाच्या प्रसंगी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, निर्मला सीतारामन आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, तसेच गुगल क्लाऊडचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस कुरियन यांची भाषणे झाली. हा प्रकल्प भारताच्या डिजिटल क्रांतीतील एक महत्वाचा अध्याय ठरेल, अशी भलावण चंद्राबाबू नायडू यांनी केली. हा गुगलचा भारतातील प्रथम एआय हब आहे. तो ‘गीगावॅट’ प्रमाणातला एक महाप्रकल्प असून तो स्थापन करण्याची संधी मिळणे, हा गुगल कंपनीचा सर्वोत्तम सन्मान आहे. संशोधन, एआयचा स्वीकार आणि आंध्र प्रदेशतले उद्योग, व्यवसाय आणि स्टार्टअपस् यांना या प्रकल्पामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे, असेही प्रतिपादन चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केले.

प्रकल्प आणि त्याचे उपयोग..?

ड भारतातील सर्वात मोठा एआय प्रकल्प, संशोधनाला मिळणार मोठा वाव

ड भारताच्या डिजिटल क्रांतीत मोठी भूमिका साकारण्याची प्रकल्पाची क्षमता

ड देशातील तंत्रज्ञ, संशोधकांना मिळणार देशातच आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची संधी

ड गुगल भारतात आणणार जागतिक गुणवत्तेचे तंत्रज्ञान आणि तांत्रिक सुविधा

Comments are closed.