गोरेगावात बोगस कॉलसेंटर उद्ध्वस्त

एका बनावट फॉरेक्स ट्रेडिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना झटपट पैसा कमवायची प्रलोभने दाखवून त्यांची शिताफीने आर्थिक फसवणूक करणाऱया एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सोमवारी त्या कॉल सेंटरवर कारवाई करत दोघांना पकडण्यात आले.
गोरेगाव पश्चिमेकडील राम मंदिर परिसरात बोगस कॉल सेंटर थाटून काही तरुण नागरिकांची एका बनावट फॉरेक्स ट्रेडिंग संकेतस्थळांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक तांबे, उपनिरीक्षक कल्याण पाटील, निंबाळकर, पाटील व पथकाने त्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे दोघे जण हाती लागले. नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
ट्रेडिंग करा, भरघोस कमवा
रोहित कदम (34), अनिल गर (35), सुनील लक्ष्मणकर (26), आशीष कुमार लालमन राम जयस्वाल (36) व त्यांचे साथीदार लोकांना गंडा घालत होते. एक बनावट ट्रेडिंगचे संकेतस्थळ बनवून हे भामटे नागरिकांना त्यात ट्रेडिंग करण्याचे आवाहन करायचे. चांगला परतावा मिळेल अशी बतावती करत ते लोकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडायचे. मग त्यांची फसवणूक करायचे. अशा प्रकारे आरोपींनी देशभरातील शेकडो नागरिकांना फसविले असल्याचे समजते.
Comments are closed.