वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेवरील मकोका रद्द; अंजली दमानिया यांचा संताप, गुन्ह्यांची यादी शेअर करत म्हणाल्या…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेल्या वाल्मिक कराडचा राईड हँड समजला जाणाऱ्या गोट्या गित्ते याच्यावरील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) गुन्हा रद्द करण्यात आला आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला असून या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी डीजी मॅडम घेणार का? असा सवाल केला आहे.
परळीतील सहदेव सातभाई खून प्रकरणात गोट्या गित्ते याच्यासह सात जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलीस महासंचालकांनी पाच पैकी सात जणांवरील मकोका रद्द केला आहे. गोट्या गित्ते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गित्ते यांच्यावरील मकोका रद्द करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यांच्यावर इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने हा निर्णय का घेण्यात आला असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत अंजली दमानिया यांनीही ट्विट केले आहे.
बीड च्या वाल्मिक कराड च्या आणि एक गँग च्या गोट्या गीतेवर १६ गुन्हे आहेत, त्याच्यावर लागलेला मकोका हा DG मॅडम नी का रद्द केला? उद्या ह्या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी डीजी मॅडम घेणार का ?
SP आणि IG हे मकोका चा प्रस्ताव उगाच पाठवतात का ? ही ५ नावे का वगळण्यात आली… pic.twitter.com/quorjoboxk
– श्रीमती अंजली दमानिया (@अंजली_दमानिया) 20 सप्टेंबर, 2025
गोट्या गित्ते विरुद्ध बीड, लातूर, परभणी, पुणे इथे 16 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची यादीच शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘बीडच्या वाल्मिक कराडच्या आणि एक गँगच्या गोट्या गीतेवर 16 गुन्हे आहेत. त्याच्यावर लागलेला मकोका हा डीजी मॅडमनी का रद्द केला? उद्या या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी डीजी मॅडम घेणार का?’
‘एसपी आणि आयजी हे मकोकाचा प्रस्ताव उगाच पाठवतात का? ही 5 नावे का वगळण्यात आली याचे उत्तर डीजी कार्यालयाने तत्काळ दिले पाहिजे. ताबडतोब फेरविचार करून हा निर्णय डीजी कार्यालयाने मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आम्ही जीवाची पर्वा न करता याच्या विरोधात लढा दिला आणि हे डीजी कार्यालय बेजबाबदारपणे मकोका रद्द कसा करू शकतात? असा सवालही अंजली दमानिया यांन केला.
Comments are closed.