गोवंडीत घरात सुरू होता ड्रग्सचा धंदा, सहा कोटींचा ड्रग्ससाठा पोलिसांनी केला जप्त

गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरातील एका घरात सुरू असलेला ड्रग्स विक्रीचा धंदा पोलिस पथकाने उद्ध्वस्त केला. त्या घरावर छापेमारी करून एमडी, गांजा, कोडेन फॉस्फेटच्या मिश्रित ओनोरेक्सच्या बॉटल्स व रोख रक्कम असा सहा कोटी 19 लाख 48 हजार रुपयांचा ड्रग्सचा साठा पोलिसांनी जप्त करून एका 23 वर्षीय ड्रग्समाफियांना बेडय़ा ठोकल्या.

बैंगनवाडी झोपडपट्टी परिसरात राहणारा सलमान शेख व त्यांचे साथीदार राहत्या घरात ड्रग्स विक्रीचा धंदा करत असल्याची खबर सपोनि मैत्रानंद खंदारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकासह शिवाजीनगर पोलिसांच्या साथीने कमलारमन झोपडपट्टीतील त्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे सहा कोटी 15 लाख लाख 60 हजार किमतीचा तीन किलो 78 ग्रॅम वजनाचा एमडी, दोन लाख 40 हजार किमतीचा 12 किलो गांजा, कोडेन फॉस्फेटमिश्रित ओनोरेसच्या 36 बाटल्या आणि एक लाख 30 हजारांची रोकड असा सहा कोटी 19 लाख 48 हजार किमतीचा ड्रग्जचा साठा पोलिसांनी तेथून जप्त केला. तसेच सलमान शेखला अटक केली. सलमान व त्यांचे साथीदार कुठून ड्रग्स आणायचे याचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Comments are closed.