सरकारने 23 दहशतवाद्यांची नावे जाहीर केली.

यादीत 17 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश : जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा, अल-कायदा संघटनेचे सक्रिय समर्थक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तानविरुद्ध एका मोठ्या कारवाईत, गृह मंत्रालयाने तेथे उपस्थित असलेल्या 23 व्यक्तींना दहशतवादी घोषित केले आहे. ही कारवाई यूएपीए अंतर्गत करण्यात आली आहे. या व्यक्ती जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि इतर संघटनांशी संबंधित आहेत. हे लोक दहशतवाद्यांची भरती करणे, भारतात घुसखोरी करणे, दहशतवादी हल्ल्यांचे कट रचणे, दहशतवादासाठी निधी उभारणे, शस्त्रपुरवठा करणे आणि इतर मदत पुरवण्यात सक्रियपणे सामील असल्याचे उघड झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलम 35 अंतर्गत पाकिस्तानशी संबंध असलेल्या 23 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या 23 व्यक्तींपैकी तिघे लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचे जवळचे सहकारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच तिघे जण 2016 मध्ये नगरोटा येथील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यात कथितरित्या सामील होते. त्याव्यतिरिक्त दोघे जण 2018 मध्ये सुंजवान लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात कथितरित्या सामील होते.

भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या पाकिस्तानस्थित 23 व्यक्तींपैकी 17 पाकिस्तानी आणि 6 भारतीय नागरिक आहेत. तथापि, हे सर्व दहशतवादी सध्या पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये उपस्थित असून दहशतवादी कारवाया करत आहेत. यादीतील व्यक्तींवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, घुसखोरी करणे आणि रसद पुरवणे, तसेच आर्थिक सेवा पुरवणे, शस्त्रपुरवठा करणे, ड्रोनद्वारे शस्त्रांची वाहतूक करणे आणि दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणे यांसारखे विविध आरोप आहेत.

युएपीए अंतर्गत घोषित दहशतवाद्यांची यादी

मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसादिक उर्फ डॉक्टर, मुफ्ती मुहम्मद असगर खान उर्फ अबू साद, हाफिज अब्दुल शकूर उर्फ कारी जरार, अब्दुल्ला जिहादी, गुलाम फरीद, मौलाना इमदादुल्ला मक्की, वसीम नूर जट, फिरदौस अहमद भट, हारून रशीद गनई, बिलाल अब्दुल अहमद मिरजे, बिलाल अब्दुल अब्दुल अहमद लो, गुलाम नूर जट उर्फ हाफिज अदबुल रौफ, अश्फाक अहमद, हाफिज खालिद वलीद, मौलाना सैफुल्लाह खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तयबी, ओवेस फारुख, कारी याकूब शेख, राणा इफ्तिखार, मोहम्मद शहीद फैसल अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.

आता भारताला सखोल कारवाई करता येणार

यूएपीए कायद्यानुसार, जर केंद्र सरकार एखादी व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याची खात्री झाली तर त्यांना दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार आहे. दहशतवादी घोषित झाल्यानंतर, एनआयएला त्यांची बँक खाती गोठवण्याचे, शस्त्रांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार मिळतात. यूएपीए कायद्यात 2019 मध्ये सुधारणा केल्यामुळे व्यक्तींना दहशतवादी घोषित करण्याची परवानगी मिळाली. हा कायदा होण्यापूर्वी केवळ संपूर्ण संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जाऊ शकत होते.

अयोध्या राम मंदिराची रेकी करणाराही ‘दहशतवादी’

केंद्र सरकारने 23 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांमध्ये अयोध्या येथील राम मंदिराची आणि नागपूरमधील आरएसएस कार्यालयाची टेहळणी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. या दहशतवाद्याची ओळख हाफिज सईदचा नातेवाईक मोहम्मद मुसादिक अशी पटली आहे. तथापि, मुसादिकने ही टेहळणी स्वत: केली की ती करवून घेतली आणि केव्हा केली, याबद्दलची माहिती अद्याप अज्ञात आहे.

Comments are closed.