केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार
नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं आज अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजीच्या पुरवठ्या संदर्भात केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर केरोसीन म्हणजेच रॉकेलची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम सुरक्षा आणि लायसेसिंग नियमात सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं या संदर्भातील राजपत्र जारी केलं आहे.
केंद्र सरकारच्या या नियमानुसार प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मालकीच्या तेल मार्केटिंग कंपन्यांच्या दोन पेट्रोल पंपावर 5000 लीटर रॉकेलचा स्टॉक ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्नपदार्थ बनवणे आणि दिव्यांसाठी वापराच्या उद्देशानं सर्वसामान्यांना रॉकेल विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रॉकेलच्या विक्रीला 60 दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी मालकीच्या तेल मार्केटिंग कंपन्यांची संख्या तीन आहे. म्हणजेच एखाद्या तेल मार्केटिंग कंपनीच्या दोन पेट्रोल पंपावर रॉकेल मिळेल. एका पेट्रोल पंपावर 2500 लीटर रॉकेलचा साठा करता येईल.
कोणत्या राज्यात रॉकेल विक्रीला परवानगी?
दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, दादरा नगर हवेली, दमन आणि दीव, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, उत्तराखंड, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, लडाख, तेलंगाना, हिमाचल प्रदेश, नागालँड, मध्य प्रदेश, सिक्कीम
दरम्यान, भारत सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं रॉकेलची विक्री मर्यादित करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2015 नंतर उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजनेद्वारे एलपीजी आणि वीज कनेक्शन दिली आहेत. त्यामुळं रेशन दुकानांमधून अनुदानावर दिलं जाणारं रॉकेल टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात आलं होतं. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 2018-20 पासून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रॉकेल विक्री बंद करण्यात आली होती.
एलपीजीचं संकट कशामुळं?
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरु होऊन एक महिना झाला आहे. इराणनं अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. प्रामुख्यानं ही सामुद्रधुनी अमेरिका आणि त्यांच्या साथीदार देशांसाठी बंद केली आहे. यामुळं ऊर्जा साधनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 टक्के तेल आणि गॅसचा पुरवठा जगभरात होतो.
आणखी वाचा
Comments are closed.