सरकार निव्वळ घोषणा करत असून हे घोषणाबाज सरकार शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे – आदित्य ठाकरे
हे सरकार निव्वळ घोषणा करत आहे, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र त्याचा कुणाला लाभ झाला, हे सरकार शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्यांचे विचारपूस करण्यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तालुक्यातील गऊळ येथील शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी टाहो फोडत. फडणवीस सरकारचे वाभाडेच काढले.
फडणवीस सरकार नुसते आश्वासन देऊन शेतकर्यांना कोरडा दिलासा देत आहे. शेतकरी दुष्काळाच्या दाहेत जळून खाक होत असताना. हे तकलादू सरकार शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या. आज शिवसेना नेते युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील गऊळ (ता. कंधार) येथील शेतकर्यांशी संवाद साधला. तेथे जमलेल्या शेतकर्यांनी जणू टाहोच फोडला. माणिक बळीराम गिरे, शिवाजीराव गिरे, यादवराव चिवडे ह्या शेतकर्यांने आपल्या शेतातील सोयाबीनचे सुकलेली रोपटे दाखवले अन त्याला लागलेला खर्च पाहता एकही शेंग नसल्याने सर्व मेहनत व खर्च अंगलट आला असल्याचे रडत रडत सांगितले. यावेळी योगेश गिरे ह्या शेतकर्यांच्या मुलाने माझ्या वडिलांचे तीन लाख कर्ज कसे फिटणार, माझे शिक्षण कसे होणार, दोन बहिणीचे लग्न कसे होणार. वडिल रात्री बेरात्री उठून बसतात. वडिलांनी काही केले तर आम्ही काय करायचे असा प्रश्न चिमुकल्याने आदित्य साहेबांना करताच उपस्थिताचे मन हेलावून गेली.
तेथील एका शेतकर्यांने चक्क फडणवीस सरकारला श्राप देत साहेब तुमचे वडील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी बोलल्याप्रमाणे एका बैठकीत सरसकट कर्जमाफी करून शेतकर्यांवर उपकार केलेत अन पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करत आहोत, असे भावनिक बोलून आदित्य ठाकरे यांचे हात हातात घेऊन भावनिक साद घातली. यावेळी थेट शेतकर्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना यापूर्वी देखील आणि आता देखील यापुढेही कायम शेतकर्यांच्या पाठीशी उभी आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांना आम्ही शिवसेना व शिवसैनिक वार्यावर सोडणार नाही. शेतकर्यांच्या नुकसानभरपाई तर हेक्टरी एक लाख रुपये देण्यात यावी ही मागणी आमची आहे. कर्जमाफी नको आम्हाला कर्जमुक्ती करुन पाहिजे. याबरोबरच पशुधनासाठी छावण्या, पाल्याला फी माफी व पुढील शिक्षण मोफत ही पण आपण मागणी करत आहोत. ह्या सर्व गोष्टींना कंटाळून शेतकर्यांनो कृपया आत्महत्या करू नयेत. तुम्ही आत्महत्या करता पण पुढे सर्व कुंटुब रस्त्यावर येते. तुमच्या अडचणीत माझा शिवसैनिक तुमच्यासाठी चौविस तास सोबत आहे, या शब्दात शेतकर्यांना धीर दिला.
यावेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाप्रमुख बबन बारसे, ज्योतिबा खराटे, भुंजग पाटील, बालाजी रेड्डी, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, महेश खेडकर, पुरूषोत्तम धोंडगे, तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव, लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, नवनाथ बापू चव्हाण, तालुकासंघटक पंडितराव देवकांबळे, सतीश पाटील उमरेकर, नवजित सिधू, निलेश मोरे, जी.एम. पवळे, दादाराव पाटील शिंदे, सदाशिव पटने यांच्यासह हजारो शेतकरी बांधावर उपस्थित होते.
Comments are closed.