खासगी लॅबवर सरकारचा अंकुश, बोगस औषधे शोधण्यासाठी खास मशीन; विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा येणार

राज्यातील खासगी लॅबच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा येणार आहे. त्याशिवाय बोगस औषधे तपासण्यासाठी खास मशीन विकत घेण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.
आरोग्य खात्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात मोठय़ा प्रमाणात विविध
लॅब आहेत. पॅथॉलॉजीपासून ते एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदी चाचण्या होतात. पण या लॅबमध्ये मिळणारे रिपोर्ट हे अनेकदा चुकीचे असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी तर विविध लॅबमध्ये एकाच रुग्णाचे वेगवेगळे रिपोर्ट आल्याचेही प्रकार घडले आहेत. तसेच त्यांच्या दरावरही कोणतेही नियंत्रण नाही. याची दखल आपण घेतली असून या लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात एक कायदाच मंजूर करण्यात येणार आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दंड तसेच कठोर शिक्षेचीही तरतूद यामध्ये असेल.
राज्यात एमआयव्हीची स्थापना
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एमआयव्ही) ची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी 36 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
फ्लाइंग स्कॉड उभारणार
बोगस औषधे शोधून काढण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून ड्रग डिटेक्शन मशीन खरेदी करण्यात आली आहे. ‘फ्लाइंग स्कॉड’च्या माध्यमातून आमचे पथक विविध ठिकाणी भेटी देऊन या मशीनच्या माध्यमातून औषधांची क्वालिटी तपासणार आहे. बोगस औषधे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
Comments are closed.