जीपीएस ट्रॅकिंग… क्षणाक्षणाची नोंद आयुक्तालयात होणार; ड्युटीवरील पोलीस काय करतोय? वरिष्ठांना कळणार

ड्युटीवर नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारी चोख काम करतोय का? हे आता वरिष्ठांना बसल्या जागी कळणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बंदोबस्ताची दिलेली जबाबदारी पोलीस कर्मचारी चोख बजावतोय की नाही याची इत्यंभूत माहिती आयुक्तालयात मिळणार आहे. या नव्या फंड्यामुळे कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांना आळा बसणार आहे. तसेच या नव्या जीपीएस ट्रॅकिंगमुळे अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील तत्काळ मदत मिळणार आहे.

पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होतअसून नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आहे. रोजचे बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध यांचे नियोजन करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असून मोठा ताण पोलिसांवर आहे. दरम्यान, वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असताना कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी आपली ड्युटी योग्य पद्धतीने निभावतात का? यासाठी जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेतला असून, महिनाभरात संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पूर्ण ताकदीने राबवला जाणार आहे.

वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघणार
जीपीएस ट्रॅकिंगमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ अपडेट मिळणार आहेत. नाकाबंदीच्या नियोजनात जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून मदत होणार आहे. तसेच कोणत्या स्पॉटवर किती कर्मचारी हजर आहेत याची माहिती मिळणार असून वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

Comments are closed.