करवीरनगरीचा ऐतिहासिक दसरा; शाही लवाजमा, सीमोल्लंघन आणि लोकसंस्कृतीचा थाट

सर्व फोटो -संजय साळवी

गुरुवारी विजयादशमीला ऐतिहासिक दसरा चौकात मावळत्या सूर्यकिरणांच्या साक्षीने करवीरनगरीचा शाही दसरा सोहळा राजेशाही थाटात संपन्न झाला. म्हैसूर पाठोपाठ देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात पारंपरिक शाही लवाजमा, सीमोल्लंघन आणि लोक संस्कृतीच्या थाटात सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी झाली. “सोनं घ्या…सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सायंकाळी परंपरेनुसार सूर्यास्तपूर्वी साडेपाचच्या सुमारास करवीर निवासिनी श्रीअंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्यां भालदार, चोपदार, घोडेस्वारासह दसरा चौक मैदानात दाखल झाल्या. याचवेळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून पारंपरिक लवाजम्यासह खास मेबॅक मोटारीतून खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती,माजी आमदार युवराज मालोजीराजे, छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती आणि यशराजे छत्रपती यांचे दसरा चौकात आगमन झाले.उ पस्थित करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भालदारांनी ललकारी देत सलामी दिली, तर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थान चे मानगीत सादर केले. यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य भव्य शामियानात सरदार, मनसबदार, लोकप्रतिनिधी,व रिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानापन्न झाले.

दसरा महोत्सव समितीकडून राजघराण्यातील सदस्यांचे स्वागतानंतर राजपुरोहितांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. बंदुकीच्या फैरी हवेत झाडून श्रीअंबाबाईला सलामी देण्यात आली. फैरींच्या सलामीने सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांनी मैदानात धाव घेतली. लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.“सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छा देत हा उत्सव उत्साहात साजरा झाला. शाही लवाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली.मार्गावर दोन्ही बाजूंस पुष्पवृष्टी करत, कोल्हापूरकरांनी उत्साहात सहभाग घेतला.

राजेशाही थाट आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम

कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवाला यंदा प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त असून,गेल्या दहा ते बारा दिवसां – पासून जिल्हा प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण केले होते. असुरांच्या संहाराने भक्तांना अभय देणाऱ्या दुर्गेच्या नवरात्रोत्सवाची सांगता,या शाही दसरा सोहळ्याने होते. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि शाही थाटात पार पडला. यावेळी राजकारण, कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन, नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लोकसंस्कृतीचे दर्शन, ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान

भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावरील राजेशाही मिरवणुकीत देवीच्या पालख्यांसह कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.या शाही सोहळ्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांचा सन्मान करीत त्यांना मिरवणुकीत विशेष स्थान देण्यात आले होते. विविध तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते.रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने चोख पार पाडले.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण: हीलरायडर्सकडून ४० वे मंगलतोरण

कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत ऐतिहासिक नगारखान्यास १९१ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि २ ऑक्टोबर १८३४ रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा सोहळा ‘कोल्हापूरची शौर्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झाला. विशेष म्हणजे, यंदा २ ऑक्टोबर हा विजयादशमीचा सण होता. ऐतिहासिक भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बांधण्यात आले.हीलरायडर्स एडवेंचर फाउंडेशनतर्फे गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. “हा उपक्रम कोल्हापूरचा अभिमान आहे,” असे शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हिलरायडर्सचे प्रमोद पाटील, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे, तहसीलदार स्वप्नील रावडे, सहज सेवाचे सन्मती मिरजे, उदय गायकवाड आदी विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

सन १८२८ ते १८३३ या काळात पाच लाख रुपये खर्चून बांधलेली पाच मजली नगारखाना इमारत ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसाची साक्ष आहे.स्थानिक कारागिरांनी बेसाल्ट दगडाचा वापर करून तयार केलेल्या आयने महालातील चकाकणाऱ्या भिंती आणि खांब आजही या इमारतीचे वैशिष्ट्य आहेत. ऐतिहासिक घड्याळ, नगारे वाजवण्याचे ठिकाण, भगवा ध्वज, गॅलरी, पायऱ्या आणि खिडक्या यांसारख्या कलाकृती पाहता, या सर्व वैशिष्ट्यांनी नगारखान्याचा ऐतिहासिक वारसा आजही जिवंत असल्याचे दिसून येते.

Comments are closed.