सस्पेन्स पिक्चर बघून नातवाने केली आजोबांची हत्या, हत्येचे गूढ उकलले; म्हसळ्यात नात्याला काळिमा

म्हसळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सस्पेन्स पिक्चर बघून नातवानेच आजोबांचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शौकत परदेशी असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आजोबा वारंवार ओरडायचे म्हणून त्यांची हत्या केल्याची कबुली नातू मोहमद परदेशी याने दिली. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी नातवाला बेड्या ठोकल्या आहेत.

फोंडा मोहल्ला येथे राहणारे शौकत परदेशी (75) हे घरात असताना एक अज्ञात व्यक्ती तोंडाला कपडा बांधून घरात घुसला. त्याने आजोबांवर वार केले आणि तो पसार झाला. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसार झाला असा बनाव नातू मोहमद परदेशी याने रचला. असगर परदेशी यांच्या तक्रारीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनेची माहिती दिलेल्या नातवावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मोहमदला तपासासाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. आजोबा वारंवार ओरडायचे म्हणून सस्पेन्स पिक्चर बघून त्यांची हत्या केल्याची माहिती त्याने दिली.

Comments are closed.