जसप्रीत बुमराह असतानाही मोहम्मद सिराज टीमचा खरा लीडर; कोणाकडून आला हा मोठा दावा?
भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी मोहम्मद सिराजबद्दल मोठा दावा केला आहे. ग्रेग चॅपेल यांनी मंगळवारी सांगितले की, जसप्रीत बुमराह संघात असो वा नसो, मोहम्मद सिराज भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा ‘खरा आणि आध्यात्मिक’ लीडर बनण्यास तयार आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर तीन सामने खेळला आणि संघाला त्यापैकी एकही विजय मिळवता आला नाही, तर मोहम्मद सिराज पाचही सामन्यात खेळला आणि बुमराहशिवाय तो आणखी धोकादायक दिसत होता.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताच्या सहा धावांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शेवटच्या सामन्यात 9 बळी घेतले आणि मालिकेत एकूण 23 बळी घेतले. त्याने पाच कसोटी सामन्यात 185.3 षटके टाकली, जी इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त आहे.
चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठीच्या त्यांच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, त्याने यापूर्वी अनेक उत्तम कामगिरी केली आहे. एमसीजीमध्ये, गाबा, पर्थ, लॉर्ड्स, केपटाऊन आणि बर्मिंगहॅम येथे, पण ओव्हलमध्ये त्याने जे केले ते आश्चर्यकारक होते.” चॅपेल पुढे दावा करतात की, “जसप्रीत बुमराह असो वा नसो, तो गिलच्या गोलंदाजी हल्ल्याचा आध्यात्मिक आणि खरा लीडर बनण्यास तयार आहे.” भारतीय फलंदाजांनी पाच कसोटी सामन्यांमध्ये 12 शतके झळकावली, परंतु सिराजच्या गोलंदाजीने सर्वांना मागे टाकले.
चॅपेल लिहितात, “असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की इतक्या शानदार फलंदाजी प्रयत्नांनंतरही, सिराज हा भारतीय संघ मालिकेत स्पर्धात्मक असण्याचे मुख्य कारण होता.” त्यांनी पुढे लिहिले की, “त्याच्या प्रयत्नांपेक्षा, मी गोलंदाज म्हणून त्याच्यातील बदलाने प्रभावित झालो. आता तो एक उत्साही गोलंदाज आहे ज्याचा एक उद्देश देखील आहे. खेळाडू आणि लीडर यांच्यातील हा फरक आहे.” सिराजला गेल्या सामन्यात सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
Comments are closed.