भाजप आमदाराच्या घरावर ग्रेनेड स्फोट
पहाटेच्या सुमारास घटना : हल्लेखोर फरार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये इम्फाळ पश्चिममध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भाजप आमदार डॉ. सपन रंजन सिंह यांच्या घरी ग्रेनेडचा स्फोट झाला. कोंथौजम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आणि राज्य सरकारचे प्रवक्ते डॉ. सपन रंजन सिंह यांच्या घरी हा स्फोट झाला. ग्रेनेड फेकल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. डॉ. सपन रंजन सिंह हे हल्ल्याच्या केवळ एक दिवस आधी नवी दिल्लीहून परतले होते. मणिपूरमधील सद्यस्थितीबाबत आढावा बैठकीच्या निमित्ताने केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. शुक्रवारी पहाटे सुमारे 1:30 वाजता त्यांच्या घरामागील आवारात हा स्फोट झाला. या घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी शुक्रवारी दुपारी आमदार सपन रंजन सिंह यांच्या निवासस्थानी वैयक्तिक भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेतला.
Comments are closed.