Grenke Freestyle Chess Open – हस्तांदोलन नव्हे ‘नमस्ते’; हरिका आणि उझबेकिस्तानच्या खेळाडूचा सामना चर्चेत, पाहा हा Video

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

Grenke Freestyle Chess Open मध्ये हिंदुस्थानी ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबोएव्ह यांच्यातील सामना एका विशेष कारणामुळे चर्चेत आला. सामन्यादरम्यान हरिकाने जेव्हा आपला पराभव मान्य करण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा याकुबोएव्हने हस्तांदोलन करण्याऐवजी अत्यंत नम्रपणे दोन्ही हात जोडून ‘नमस्ते’ केले. या दोघांमधील हा आदरयुक्त संवाद सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत असून, खेळातील खिलाडूवृत्तीचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे.

याकुबोएव्हने यापूर्वीही हिंदुस्थानच्या आर. वैशालीसोबतच्या सामन्यानंतर हस्तांदोलन टाळले होते, ज्यामुळे त्यावेळी थोडा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्याने वैशालीची भेट घेऊन फुले आणि चॉकलेट्स देत तिची माफी मागितली होती. त्याने स्पष्ट केले की, धार्मिक कारणांमुळे तो परस्त्रियांना स्पर्श करत नाही. आपल्या वागण्याने कोणाच्याही भावना दुखावू नयेत आणि सर्व हिंदुस्थानी खेळाडूंबद्दल आपल्याला आदर असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. वैशालीनेही त्याची ही भूमिका सकारात्मकतेने स्वीकारली होती.

मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, विन्सेंट केमर आणि हॅन्स निमन हे 5/5 गुणांसह आघाडीवर असून त्यांच्यात लवकरच अटीतटीचा सामना रंगणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन देखील या शर्यतीत कायम असून स्पर्धा अधिक तीव्र होत आहे. हजारो स्पर्धकांच्या सहभागामुळे आणि मोठ्या बक्षीस रकमेमुळे ही स्पर्धा सध्या जागतिक बुद्धिबळ वर्तुळात आकर्षणाचे केंद्र बनली असून, आगामी फेऱ्यांमध्ये क्रमवारीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.