GSLV-F17 प्रक्षेपणासाठी सज्ज

‘ईओएस-05’चे होणार प्रक्षेपण : भूस्थिर कक्षेतून छायाचित्रे घेणारा पहिला भारतीय उपग्रह

न्यूज एजन्सी/श्रीहरिकोटा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 4 सप्टेंबर रोजी पहाटे 2:55 वाजता ही महत्त्वपूर्ण मोहीम प्रक्षेपित करणार आहे. इस्रो जीएसएलव्ही-एफ17 रॉकेटचा वापर करून ईओएस-05 उपग्रह अवकाशात सोडणार आहे. हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाईल. जीएसएलव्ही-एफ17 हे जीएसएलव्ही रॉकेटचे 19 वे उड्डाण असेल. हे रॉकेट ईओएस-05 ला एका निश्चित कक्षेत पोहोचवणार आहे. ईओएस-05 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. भूस्थिर कक्षेतून प्रतिमा टिपणारा हा भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह असल्यामुळे पृथ्वीच्या प्रतिमा आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणे शक्य होईल, असा दावा इस्रोने केला आहे.

2025 आणि 2026 मध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अपयशानंतर जीएसएलव्ही-एफ17 हे रॉकेट महत्त्वाची मोहीम पार पाडणार आहे. या मोहिमेतून केवळ सामरिक आणि नैसर्गिक निगराणीच्या उद्देशाने 2,367-किलोग्राम वजनाचा, अत्याधुनिक उपग्रह पृष्ठभागापासून 36,000 किलोमीटर उंचीवर स्थापित करणार आहे. तसेच वारंवार येणाऱ्या अपयशांशी झगडत असलेल्या इस्रोची प्रतिष्ठा आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल. जीएसएलव्ही मार्क-2 ला त्याच्या सुरुवातीच्या विकासाच्या वर्षांमध्ये अनियमित कामगिरीमुळे ‘नॉटी बॉय’ असे टोपणनाव दिले गेले असले तरी, त्याची इंजिने पीएसएलव्हीच्या इंजिनांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. यामुळेच इस्रोचे शास्त्रज्ञ तांत्रिक दृष्टिकोनातून या मोहिमेच्या यशाबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास बाळगून आहेत.

Comments are closed.