जीएसटी 2.0 आज 'स्थापित' होईल
करप्रणालीतील सुधारणांमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची दरकपात : सर्वसामान्यांना लाभ होणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘जीएसटी 2.0’ची आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर अंमलबजावणी होत असून अनेक जीवनावश्क वस्तूंची दरकपात होणार आहे. जीएसटी दरकपातीचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना देण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी तयारी झाली असून अनेक कंपन्या आणि बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू केले जातील. याचा थेट फायदा जनतेला होईल. या नवीन सुधारणा लागू झाल्यापासून, देशभरात खाद्यान्न आणि पेयांपासून ते एअर कंडिशनर, टीव्ही आणि कार आणि दुचाकीपर्यंत बऱ्याच वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांना घटस्थापनेच्या मुहुर्तावर एक महत्त्वाची भेट दिली आहे. जीएसटी परिषदेच्या अलिकडच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केल्यानंतर नवीन जीएसटी दर आजपासून देशभरात लागू केले जात आहेत. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच कररचनेत सुधारणा केल्यामुळे हा बदल ऐतिहासिक मानला जात आहे. नवीन जीएसटी दरांमुळे चीज, तूप, साबण, शाम्पू, कार आणि एअर कंडिशनरच्या किमती कमी झाल्या आहेत. पनीर, रोटी, चपाती आणि पराठा यासारख्या काही वस्तूंवर आता कर आकारला जाणार नाही. तसेच जुना साठा देखील स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, तंबाखू, पान मसाला, कार्बोनेटेड पेये आणि मोठ्या कार, नौका आणि वैयक्तिक वापरासाठी विमाने यासारख्या लक्झरी वस्तूंवर 40 टक्के विशेष कर आकारला जाईल.
आता चारऐवजी फक्त दोन दर
आतापर्यंत देशात 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार जीएसटी दर होते. तथापि, 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत, चार दरांऐवजी फक्त दोन दर कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन प्रणाली अंतर्गत, फक्त 5 टक्के आणि 18 टक्के स्लॅब लागू होतील. यामुळे कररचना सोपी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 40 टक्के हा आणखी एक स्लॅब असला तरी त्यात दारू, सिंगारेट यासारख्या ‘सीन’ प्रॉडक्ट्सचा समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या वस्तूंवर परिणाम होईल?
सरकारी अधिसूचनेनुसार, आता अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. यामध्ये तेल, साबण, शाम्पू, दूध, लोणी आणि तूप यासारख्या दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. तसेच टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, बाईक आणि कार यासारख्या प्रमुख उत्पादनांचे दरही स्वस्त होतील. सरकारचा दावा आहे की या बदलामुळे महागाई नियंत्रित होण्यास मदत होईलच पण ग्राहकांच्या खिशावरही त्याचा थेट परिणाम होईल.
औषधे, आरोग्य सेवा करमुक्त
जीएसटी दरांमधील या बदलांचा आरोग्यसेवा क्षेत्रावर मोठा परिणाम होईल. 33 जीवनरक्षक औषधांवरून जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. शिवाय, वैद्यकीय पुरवठ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवरील 12 टक्के जीएसटी देखील काढून टाकण्यात आला आहे. आरोग्य विमा योजनांवरील कर देखील काढून टाकण्यात आला असून आता प्रीमियम कमी होणार आहे.
‘लाभ’ न मिळाल्यास तक्रार करण्याची सुविधा
सामान्य लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे की जर दुकानदार किंवा कंपन्या नवीन दरांनुसार किंमती कमी करत नाहीत तर काय करावे. करकपात असूनही दुकानदार जुन्या किमतीत वस्तू विकत राहिल्याचे प्रकार यापूर्वी निदर्शनास आले आहेत. मात्र, या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ज्याद्वारे ग्राहक थेट तक्रारी करू शकतात. साहजिकच दुकानदार किंवा व्यापाऱ्यांकडे जुना स्टॉक उपलब्ध असल्यास तो नवीन जीएसटी दरानुसारच विक्री करावा लागणार आहे. तसे न केल्यास व्यापारी किंवा दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
तक्रार दाखल करण्याचे पर्याय…
- राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन : ग्राहक 1800-11-4000 किंवा 1915 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. याव्यतिरिक्त तक्रारी व्हॉट्सअॅपद्वारे 8800001915 वर देखील पाठवता येतात.
- वेबसाईट : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या म्दहेल्सपत्ज्त्ग्हा.gदन्.ग्ह या अधिकृत वेबसाईटवरही तक्रारी दाखल करता येतात. या वेबसाईटवर संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून तक्रार सबमिट करावी लागेल.
- मोबाइल अॅप आणि उमंग अॅप : गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून एनसीएच मोबाइल अॅप डाउनलोड करून तक्रारी दाखल करता येतात. उमंग अॅपमध्ये ग्राहक तक्रारींचा पर्याय देखील आहे.
- ग्राहक मंच : जर तक्रार एनसीएच किंवा कंपनी/दुकानदार पातळीवर सोडवली गेली नाही, तर तुम्ही ग्राहक मंचाकडे जाऊ शकता. ग्राहक आपल्या शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही ग्राहक मंचाकडे केस दाखल करू शकतात.
दिलासादायी करकपात….
► साबण, शाम्पू, अन्नपदार्थ, इलेक्ट्रॉनिक्स आणि कार-दुचाकी यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील.
► जीवन आणि आरोग्य विम्यावरील 18 टक्के कर शून्य केल्यामुळे विमाधारकांना करमुक्तीचा दिलासा मिळेल.
► सिमेंटवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के केल्यामुळे घर बांधण्याचा किंवा नूतनीकरणाचा खर्च कमी होईल.
► टीव्ही, एअर कंडिशनरसारख्या वस्तूंवरील कर 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने स्वस्त होतील.
► आता 33 आवश्यक औषधांवर, विशेषत: कर्करोग व गंभीर आजारांसाठी असलेल्या औषधांवर कोणताही कर नाही.
► 350 सीसी पर्यंतच्या लहान कार व मोटारसायकलींवर आता 28 टक्केऐवजी 18 टक्के कर आकारला जाईल.
► ऑटो पार्ट्स आणि तीन चाकी वाहनांवरील करदेखील 28 टक्क्यांवरून 18 टक्के केल्यामुळे त्या स्वस्त होतील
Comments are closed.