जीटी वि डीसी आयपीएल 2025: खांबिर सुदर्शन, इंटेलिजेंट शुबमन

जीटी वि डीसी आयपीएल 2025: काल झालेल्या दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यात दिल्ली संघाचा घरच्या मैदानावर ४  था पराभव झाला…आणि आता त्यांची प्ले ऑफ मधील वाटचाल अधिक खडतर झाली आहे…आता दिल्ली संघाला प्ले ऑफ च्या प्रवासात मुंबई आणि दिल्ली संघाला भेटायचे आहे…गमतीचा भाग म्हणजे प्ले ऑफ मधील तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणारे हेच संघ पुढील लढतीत एकमेकांसमोर उभे असतील..कालच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळाला तो बुद्धिमान कर्णधार गिल..आणि त्याचा खंबीर साथीदार सुदर्शन…काल या दोघांनी बिनबाद २०५ धावा ध्वफलकावर लावल्या…आणि असा पराक्रम याच जोडीने २०२४ मध्ये चेन्नई विरुद्ध केला होता.

तुम्ही जेव्हा २०० धावांचा पाठलाग करीत असता तेव्हा तुम्हाला तो अधिक हुशारीने करावयाचा असतो..कारण प्रति षटकामागे सरासरी १० धावांची असल्यावर निर्धाव चेंडू खेळण्याचे तुमचे स्वातंत्र्य कमी झालेले असते..पण काल सुदर्शन आणि गिल या जोडीने ती हुशारी दाखविली…त्यांनी पहिल्यांदा पॉवर प्ले मध्ये बिनबाद ५९ धावा लावल्या …त्यानंतर ९ व्या षटकापासून १६ व्या षटकापर्यंत प्रत्येक षटकात एक षटकार येईल हे पाहिले…आणि त्यात आघाडीवर होता कर्णधार शुभमन….शुभमन आणि सुदर्शन यांनी स्वतःचे अर्धशतक ३३ चेंडूत पूर्ण केले….पण त्यानंतर या दोघांनी जो हल्ला केला त्यात दिल्ली संघ पूर्णपणे हतबल झाला.

शुभमन आणि सुदर्शन या दोघांची खेळण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे…मोठे फटके खेळताना आपल्या पायांची हालचाल कमी झाली तरी चालेल असे शुभमन मानतो…तर कुठलाही फटका खेळताना तो चेंडूच्या जवळ जाऊनच खेळला पाहिजे असे सुदर्शन मानतो…या स्पर्धेत त्याने ज्या तंत्रशुद्धतेने धावा केल्या आहेत त्या पाहिल्यावर त्याच्याकडून असलेल्या इंग्लंड दौऱ्यामधील आशा उंचावल्या आहेत…किती शास्त्रीय पद्धतीने खेळतो…त्याने मारलेल्या नटराजन याच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडून गेला..तर मुस्तफिझूरं याचे दुसऱ्या स्पेल मधील केलेले षटकाराने स्वागत त्याची विविधतात दर्शवून गेला…कर्णधार शुभमन तर डोक्यामध्ये गणित पक्के करून आल्यासारखा खेळत होता…कुठल्या चेंडूवर कधी षटकार मारावयाचा आहे हे जणू काही त्याच्या डोक्यात पक्के आहे इतके सहज तो खेळत होता.. त्याने कुलदीप आणि विप राज यांना मारलेल्या फटक्यावरून त्याचे फिरकी गोलंदाजी खेळण्याचे कौशल्य दर्शविते..तर चमीरा याला मारलेल्या मिड विकेट वरील षटकाराने तो भारतीय खेळपट्टीवर का राजा आहे हे सांगून गेले. दिल्ली संघाची गोलंदाजी स्टार्क याच्या अनुपस्थिती लंगडी वाटली…पण मुकेश याची निवड कदचित अधिक सार्थ ठरली असती…पण अक्षर आणि दिल्ली व्यवस्थापन कदाचित आंतरराष्ट्रीय मोठ्या नावांच्या मोहाला बळी पडले असतील.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने राहुल याच्या शतकाच्या जोरावर १९९ धावा लावल्या…राहुल जेव्हा पूर्ण भरात खेळत असतो तेव्हा रोहित इतका लेझी एलीगन्स असलेला आणि विराट कोहली इतका भक्कम असलेला फलंदाज वाटतो…त्याच्याकडे क्रिकेटमधील सर्व फटके आहेत…तो लेटकट पासून स्कूप पर्यंत सर्व फटके खेळतो..कालसुद्धा त्याने आपल्याकडील असलेल्या सर्व फटक्यांची मुक्तपणे उधळण केली.. पोरेल अक्षर आणि स्टब सोबत महत्वाच्या भागीदारी करून गुजरात संघासमोर २०० धावांचे आव्हान ठेवले..पण कालचा दिवस नेहरा गुरुजींच्या शिष्यांचा होता…राजधानीत राज्य या दोन राजपुत्रांनी केले..त्यांनी काल त्यांच्याकडील असलेल्या फटाक्यांनी एक मैफिल सजविली…त्यामध्ये एक गायक भीमसेन जोशी यांच्या इतका शास्त्रीय होता…तर दुसरा आर डी यांची शैली जोपासून मुक्तपणे वावरणारा होता.

संबंधित बातमी:

IPL 2025 Points Table : सुदर्शन-गिलच्या वादळात दिल्ली गेली वाहून; गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री; चौथ्या स्थानासाठी रंगणार शर्यत

अधिक पाहा..

Comments are closed.